नाशिक : घरगुती साडी विक्रीच्या नावाखाली फ्लॅटमध्ये सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. जुना गंगापूर नाका भागात ही कारवाई करण्यात आली. तीन तरुणींची सुटका करीत पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यात राजू यादव (भगवती अपार्टमेंट) या संशयिताचा समावेश आहे. घरगुती साडी विक्री व्यवसाय करीत असल्याचे भासवून संशयित महिला आपल्या फ्लॅटमध्ये ग्राहकांना मुंबईस्थित मुली पुरवीत होती.

या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. बनावट ग्राहक पाठवून सरकारवाडा पोलिसांनी छापा टाकला. ताब्यात घेतलेल्या तीन युवतींची रवानगी आधार आश्रमात करण्यात आली आहे.

या प्रकरणी महिलेसह तिला ग्राहक पुरविणाऱ्या दलालास अटक करण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणावरून मारहाण; हल्ला

किरकोळ कारणातून चार जणांच्या टोळक्याने तरुणास बेदम मारहाण करीत चाकू हल्ला केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. सुमित चौधरी, प्रतीक बेलेकर, कुणाल परिया आणि श्रेयस म्हस्के अशी संशयितांची नावे आहेत. या संदर्भात रोहित लव्हेरा (महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) याने तक्रार दिली.

संशयित द्वारका भागातील श्रीनाथ ट्रॅव्हल्ससमोर उभे होते. या वेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या रोहित लव्हेरा याने जेवण कुठे आहे असे संशयितांना विचारल्याने हा वाद झाला. संतप्त टोळक्याने शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने गालावर वार केला.ोंशयितांनी मोटारसायकलचेही नुकसान केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा गावात जुगारी अटकेत

वडाळा गावातील सल्ली पॉइंट येथे उघडय़ावर जुगार खेळणाऱ्या नऊ  जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी नवनाथ मोरे, इरफान खान, ज्ञानेश्वर आस्वंदकर, विजय वाघ, सलमान शेख, सुनील गोफणे, युवराज जाधव, मोहसिन शेख, आकाश गोफणे या संशयितांना अटक करण्यात आली.

काही युवक सल्ली पॉइंट येथील मोकळ्या जागेत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. संशयितांच्या ताब्यातून एक हजार ४८० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.