02 July 2020

News Flash

कारागृहातील बंदिवान दीड हजारांहून अधिक गणेशमूर्ती तयार करणार

नाशिककरांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध 

(संग्रहित छायाचित्र)

‘श्रीं’च्या आगमनाला महिनाभराचा अवकाश असला तरी गणेशोत्सवासाठी व्यावसायिक वर्तुळात लगबग वाढली आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी नाशिककरांसाठी पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. यंदा १५००हून अधिक गणेशमूर्ती तयार करण्याचा बंदिवानांचा संकल्प असून त्यासाठी दिवस-रात्र काम सुरू आहे. १८ बंदिवान या प्रक्रियेत गुंतले आहेत. वेगवेगळ्या आकारातील शाडू मातीच्या मूर्ती साधारणत: ५०० रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत  विक्रीसाठी असतील. गणेशोत्सवाच्या अवघे सात दिवस आधी या मूर्ती प्रवेशद्वाराजवळील नवीन विक्री केंद्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम यांनी दिली.

बंदिवानांचा कारागृहातील वेळेचा सदुपयोग व्हावा, त्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवून ठेवण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आठ कारखाने आहेत. वेगवेगळ्या कलांच्या आधारावर कारखान्यात काम सुरू असताना साधारणत: तीन वर्षांपूर्वी तत्कालीन कारागृह अधीक्षक राजकुमार साळवी यांच्या पुढाकाराने बंदिवान सागर पवारने गणेशमूर्ती तयार करण्याचे काम हाती घेतले. हे प्रशिक्षण अन्य २० बंदिवानांना देण्यात आले. तीन वर्षांत या कारखान्याची उलाढाल १० लाखांच्या घरात पोहोचली. मागील वर्षी गणेशोत्सव काळात १३ लाखांची, तर अन्य वेळेत वेगवेगळ्या मूर्तीची विक्री करून एकूण १९ लाखांचा व्यवसाय मूर्ती विभागाने केला असल्याची माहिती वाघ आणि कदम यांनी दिली.

या माध्यमातून बंदिवानांना रोजगार उपलब्ध झाला असून महसुलात वाढ झाली आहे. कारागृहातील मूर्ती विभागाचे वैशिष्टय़े म्हणजे ‘स्वस्त आणि सुंदर’ मूर्ती. गणेशमूर्तीना मिळणारा प्रतिसाद पाहता डिसेंबरपासूनच मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले जाते. मुंबई, गुजरातहून निविदा प्रक्रियेद्वारे शाडू माती, रंग, आभूषण आदी साहित्य मागविण्यात येते. यंदा कागदाच्या लगद्यापासून १२ फुटांची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. ती यंदाचे आकर्षण आहे. सर्वच मूर्ती शाडूच्या असूनही बाजारदरापेक्षा स्वस्त तसेच सुंदर असतात. जास्त खडे वापरून सजावट केलेली असते. त्यामुळे मूर्ती लगेच डोळ्यात भरते. अधिकाऱ्यांसह ग्राहकांनी आतापासूनच आगाऊ नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 12:46 am

Web Title: jail imprisonment will be made for ganesh idol abn 97
Next Stories
1 संघ प्रचारकांकडून आता शेती प्रश्नांचाही अभ्यास
2 रस्ते-चौक नामकरणाचा प्रघात शिवसेना मोडणार
3 लोकसभा निवडणूक कामाच्या देयकांना दिरंगाई
Just Now!
X