सैन्य दलाच्या ‘सद्भावना’ उपक्रमात सहभाग

नाशिक : जम्मू-काश्मीरमध्ये सीमांचे रक्षण करण्याबरोबर भारतीय लष्कर दुर्गम भागातील स्थानिक नागरिकांसाठी सद्भावना मोहिमेंतर्गत शिक्षण, आरोग्य यांसह इतर विषयांवर काम करीत आहे. या उपक्रमात देशातील नागरिकांनी, मुख्यत्वे डॉक्टरांनी सहभागी होण्याच्या मराठा बटालियनच्या आवाहनास नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आयएमए नाशिक शाखेच्या वतीने प्रजासत्ताकदिनी आयोजित ध्वजवंदन सोहळ्यात उपरोक्त विषयावर चर्चा झाली. शालिमार येथील आयएमएच्या प्रांगणात प्रजासत्ताकदिनी कुपवाडा येथे कार्यरत मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रणय पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी पवार यांनी सैन्य दलामार्फत जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. देशाच्या सीमांचे रक्षण आणि घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य दल अहोरात्र कार्यरत असते. सीमावर्ती भागात तैनात भारतीय सैन्याकडून जोडीला सद्भावना मोहिमेत स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत औषधोपचाराची व्यवस्था सैन्यामार्फत केली जाते. दूरवरील गावांपर्यंत वीज, पाणी, रस्त्यांच्या सुविधांची पूर्तता केली जात असल्याचे पवार म्हणाले.

नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वर्षी नाशिकचे डॉक्टर जम्मू-काश्मीरमध्ये सेवा देण्यास येतील असे नमूद केले. या संबंधीची पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टरांची नांवे निश्चित केली जातील, असे डॉ. प्राजक्ता लेले यांनी सांगितले.