अन्य चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग १२ ड साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महागठबंधनचा घटक पक्ष असलेल्या जनता दलाचे मुश्तकिम डिग्निटी यांनी दणदणीत विजय मिळवला. जनता दलाने तब्बल सात हजाराहून अधिक मताधिक्य घेतल्याने चौघा पराभूत उमेदवारांना अनामतही वाचविता आलेली नाही.

जनता दलाचे दिवंगत नेते निहाल अहमद यांचे पुत्र नगरसेवक बुलंद इकबाल यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या एका जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महाविकास गठबंधनकडून जनता दलाचे मुस्तकिम डिग्निटी, काँग्रेसचे मोहंमद फारुख अन्य तीन अपक्ष असे एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी गुरुवारी मतदान पार पडले. मतदारांचा अनुत्साह दिसून आलेल्या या निवडणुकीत अवघे ३९ टक्के मतदान झाले होते. शुक्रवारी मतमोजणीत डिग्निटी यांनी सात हजार ९९२ मते घेत एकतर्फी विजय मिळवला.

तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले काँग्रेस उमेदवार मोहम्मद फारूक मोहम्मद हनीफ यांना केवळ ५१० मतांवर समाधान मानावे लागले. ८१५ मते मिळवत अपक्ष उमेदवार अन्सारी मोहंमद इम्रान शकील यांनी दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली. अपक्ष अब्दुल खालिक गुलाम यांना १२० आणि अन्सारी मोहंमद इस्माईल यांना ३३ मते मिळाली. नोटाला ८९ मते मिळाली. आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक, मतमोजणी प्रक्रिया पार पडली.