ग्रामीण भागात आजही पती कोणी प्रतिष्ठीत व्यक्ती अथवा जबाबदार अधिकारी असेल तर त्याच्या सौभाग्यवतींना आपणही त्याच दर्जाचे आहोत असे वाटून जाते आणि मग पतीचे पद, वलयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फायदा त्या घेऊ लागतात. शहरी भाग देखील त्यास अपवाद नाही. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एका अधिकाऱ्याला आपल्या सौभाग्यवतीच्या हट्टासमोर कसे नतमस्तक व्हावे लागले, याचा प्रत्यय कुंभमेळ्यात बीएसएफचे जवान आणि भाविकांनी घेतला. रामकुंड परिसरात आपणास कोणी वाली नसल्याची भाविकांमध्ये भावना असताना या सौभाग्यवतींच्या दिमतीला सहा ते सात बंदुकधारी जवान तैनात होते. सौभाग्यवतींनी तिसऱ्या शाही पर्वणीचे हवे तिथे आणि हव्या तितक्या वेळ ‘फोटोसेशन’ केले. यावेळी त्यांचे कमांडंट पती सोबत होते. सौभाग्यवतींच्या ‘फोटोसेशन’ने जवानांना चांगलीच कसरत करावी लागली.
कुंभमेळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस, गृहरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दलासह विविध यंत्रणांच्या मदतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व विभागांतील जवानांवर बंदोबस्ताचा कमालीचा ताण राहिला. तुलनेत अधिकारी वर्गावर तो कमी म्हणता येईल, अशी स्थिती. एखाद्या तुकडीचे प्रमुखपद असल्यास मग केवळ नियोजनाची अंमलबजावणी हीच काय अधिकाऱ्यांची जबाबदारी. यामुळे काही अधिकारी दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचा आनंद घेता यावा म्हणून सहकुटुंब दाखल झाले. बंदोबस्ताची जबाबदारी जवानांवर असल्याने काही अधिकाऱ्यांनी सौभाग्यवतींची जबाबदारी अगदी नेटाने सांभाळण्यात धन्यता मानली. बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारी त्याचे उदाहरण म्हणता येईल. या दलातील जवानांवर रामकुंड व परिसरातील सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. बीएसएफच्या तुकडीचे प्रमुख असणारे कमांडंट दर्जाचे अधिकारी पत्नीसमवेत या ठिकाणी उपस्थित होते. शाही स्नानाचा सोहळा जवळून अनुभवण्याची, त्याचे छायाचित्रण काढण्याची बहुदा सौभाग्यवतींची मनिषा होती. गोदा काठावर भाविकांची प्रचंड गर्दी असली तरी पत्नीची इच्छा तितकीच महत्वाची होती. यावर ‘बीएसएफ’च्या सहा ते सात बंदुकधारी जवानांच्या सुरक्षा कवचाद्वारे तोडगा काढण्यात आला. या सौभाग्यवती ज्या ज्या ठिकाणी जातील, त्याच्या पुढे-मागे जवानांचा ताफा मार्गक्रमण करत होता. पावसापासून बचावासाठी एका जवानाला छत्री घेऊन उभे रहावे लागले. गोदा किनाऱ्यावरील अनेक मंदिराच्या गर्भगृहात गर्दीच्यावेळी त्यांना सहज प्रवेश मिळाला. त्यांनी मंदिरातील मूर्ती, सभोवतालचा परिसर आपल्या भ्रणध्वनीत टिपला.
त्यानंतर सौभाग्यवती रामकुंडा लगतच्या पटांगणात पोहोचल्या. यावेळी त्यांचे पती समवेत होते. पोलीस मदत केंद्राच्या व्यासपीठावर हे दोघे स्थानापन्न झाले. बंदुकधारी जवान व्यासपीठालगत थांबले होते. सौभाग्यवतींनी पुन्हा एकवार ‘फोटो सेशन’ केले. समोरील बाजूस मोटारीतून साधू-महंत दाखल होत होते. भाविकांची त्यामुळे तारांबळ उडत होती. कोणत्या बाजूने जावे आणि कोणत्या बाजूने बाहेर पडावे हे सांगण्यास त्यांना कोणी उपलब्ध नव्हते. त्यावेळी स्नान करताना सोनसाखळी चोरटय़ाला पकडून भाविकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर जात असताना बंदुकधारी जवानांनी त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. साहेबांच्या सौभाग्यवतींची त्यांना अधिक काळजी होती. या स्थितीत सौभाग्यवतींनी अर्धा तास सर्व क्षणचित्रे बंदीस्त करण्याचे काम सुरू ठेवले. त्यानंतर अजुन कुठे जाता येईल का, याचा अंदाज घेत कडेकोट बंदोबस्तात त्या रामकुंडाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.