News Flash

सराफ व्यवसाय सुरू करू द्यावा!

ग्रामीण भागांत जिल्हा सराफ व्यावसायिक संघटनेची मागणी

ग्रामीण भागांत जिल्हा सराफ व्यावसायिक संघटनेची मागणी

नाशिक : ‘करोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने टाळेबंदी तीन मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या टाळेबंदीमुळे ग्रामीण भागात वेगवेगळ्या अडचणींना व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सराफी व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी दि नाशिक सराफ असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

करोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तुटण्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदीचा कालावधी वाढवला आहे. जिल्ह्य़ात ३५ हून अधिक करोनाबाधित रुग्ण असल्याने जिल्हा रेड झोन मध्ये पोहचला आहे. या सर्वाचा अप्रत्यक्ष परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. टाळेबंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. मजुरी करणारे किंवा हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना उदरनिर्वाहाचे साधन नाही. ग्रामीण भागात पैसे जमविण्यासाठी काहींकडून सोने तारण ठेवले जाते. मात्र सराफ  दुकान बंद असल्याने सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनच्या वतीने जिल्ह्य़ातील करोनाचे क्षेत्र वगळता व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

ग्रामीण भागातील अर्थकारण हे सराफी व्यावसायिकांवर अवलंबून आहे. सद्यस्थितीत ग्रामीण तसेच सर्वसामान्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. नागरिकांची आर्थिक पत सुधारण्यासाठी सराफी व्यवसाय सुरू होणे गरजेचे असल्याचे संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले. आर्थिक चणचण जाणविण्यास सुरूवात झाली की नागरीकांकडून सोने मोडणे, सोनेतारण ठेवत आपली आर्थिक गरज भागविली जाते. अनेक सराफी व्यवसायिक हे सोने तारणचा व्यवसाय बँकिंग स्वरूपात चालवित असल्याने बँकिंगच्या धर्तीवर सराफी व्यवसायाला परवानगी देण्यात यावी, याकडे संघटनेने लक्ष वेधले.

बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये सोनेतारणावर कर्जासाठी सोने तारणाचे मूल्यांकन हे सराफी व्यवसायिक करत असतात. वित्तीय संस्था या त्यांच्या पेढीवर जावूनच हे काम करत असतात. सराफ व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. तसेच ग्रामीण भागात सराफी व्यवसायिकांचे आणि त्यांच्या ग्राहकांचे पिढय़ानपिढय़ांचे संबंध असल्याने उसने, तारणच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण होत असते. या सर्व पार्श्वभूमीवर व्यवसाय सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने परवानगी दिल्यास, संपूर्ण सराफ बाजारातील प्रमुख रस्त्यांवर र्निजतूकीकरणाबाबत काळजी घेण्यात येईल. सराफ व्यावसायिक त्याच्या पेढीवर तशी काळजी घेईल.

नियमांचे पालन केले जाईल

येणाऱ्या ग्राहकांशी योग्य अंतर ठेवत व्यवसाय करण्यात येईल. कमीत कमी कर्मचाऱ्यांना सोबत घेत काम करण्यात येईल. ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:02 am

Web Title: jewellers association in rural areas demand to allow business zws 70
Next Stories
1 कांदा उत्पादकांची दुहेरी कोंडी
2 उद्योगांना काही अटींवर परवानगी
3 coronavirus : नाशिक जिल्ह्य़ातील पहिला रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतला
Just Now!
X