सराफ व्यावसायिकांच्या संघटना एकवटल्या

पावसाचा जोर वाढताच तुंबणारे शहर अशी नाशिकची ओळख काही वर्षांपासून होऊ लागली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोदाकाठापासून जवळ असलेल्या सराफ बाजाराला बसतो. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यावसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या मागण्यांकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी दोन तास येथील सराफ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सराफ बाजारच्या समस्यांवर आवाज उठविण्यासाठी सराफ व्यावसायिकाच्या संघटना एकटवल्या असून याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीने सराफ बाजारातील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरते. पाण्यासोबत आलेला गाळ, चिखल यामुळे फर्निचरसह दुकानातील महत्त्वाच्या सामानाचे नुकसान होते. याशिवाय रंगरंगोटी, विद्युत वितरण व्यवस्था आणि अन्य सोयी सुविधांचा खर्चही वाढतो. याबाबत नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या वतीने कुठलीच उपाययोजना होत नाही. यामुळे सराफ व्यावसायिकांसह परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. बुधवारी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात सर्व व्यावसायिकांच्या संघटना एकत्र आल्या. स्थानिकांनी याविरोधात आवाज उठविला. सकाळी १० ते १२ या वेळेत बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवण्यात आली.   सराफ व्यावसायिकांच्या सभागृहात सराफांसह दहीपूल, शुक्ल गल्ली, चांदवडकर लेन, बोहरपट्टी परिसरातील इतर व्यावसायिक आणि रहिवासी यांची एकत्रित बैठक झाली. या वेळी व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यावरण अभ्यासकांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली. ही समिती ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सराफ संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.  कोटय़वधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या महापालिकेच्या भुयारी गटार योजना आणि पावसाळी गटार योजना कुचकामी ठरल्या आहेत. पावसाचे पाणी शहराबाहेर नेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पावसाचे पाणी सराफ बाजारात एकत्र होते. मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण होत असल्याची टीका पर्यावरणप्रेमी आणि जल अभ्यासक देवांग जानी यांनी केली.  सराफ बाजारात भरणाऱ्या फुलबाजार आणि भाजीबाजारामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे सराफ बाजारातील गटारी आणि नाल्यांचे ढापे बंद होत असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होत आहे.  हे विक्रेते सर्रास रस्त्यावर दुकान मांडून व्यवसाय करत असल्याने सराफ बाजारात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे फुलबाजार आणि भाजीबाजार येथून हटविण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. बैठकीस घाऊक किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, फेरीवाला व्यवस्थापन समितीचे राजेंद्र दिंडोरकर, सचिन वडनेरे, गिरीश नवसे आदी उपस्थित होते.