महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. मायको दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी गरोदर मातेची रिक्षातच झालेल्या प्रसुतीने त्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली. या प्रश्नाचे राजकीय पक्षांनी भांडवल करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सद्यस्थितीत आरोग्य विभागात सुमारे पावणे चारशे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आहेत. आहे ते कर्मचारी धड काम करत नसल्याची ओरड असताना आरोग्य विभागाने सहा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व श्रेणीतील २५० हून अधिक रिक्त पदे भरण्याची धडपड चालविली आहे.

मायको दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व परिचारिका नसल्याने महिलेची प्रसुती रिक्षातच झाली. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई मागे घ्यावी, याकरिता राजकीय पातळीवरून प्रयत्न झाले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कधीही वेळेवर उपस्थित नसतात. या पाश्र्वभूमीवर सर्व रुग्णालयात बायोमेट्रीक यंत्रणा बसविण्याचे निश्चित झाले. पालिका रुग्णालयात रुग्णांना कित्येक तास तिष्ठत बसावे लागते. आरोग्य विभागावर दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च होऊनही त्याचा लाभ गोरगरीब रुग्णांना मिळत नाही. रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. अस्वच्छता, मूलभूत सुविधांची वानवा, औषधांचा तुटवडा याची झळ रुग्णांना बसते. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी योग्य पध्दतीने काम करीत नाही. काही अधिकारी खासगी रुग्णालयात सेवा देतात. पालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण पळवून नेतात, अशी तक्रार शिवसेनेने केली होती. आरोग्य विभागात सध्या ३७५ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आहेत. बिटको, डॉ. झाकीर हुसेन, इंदिरा गांधी, गंगापूर, सावित्रीबाई फुले तसेच अण्णासाहेब दातार या रुग्णालयांसह १७ प्रसुती गृहामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वर्ग दोन, तीन व चारसाठी ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र केवळ २०० जण हा कारभार रेटत आहे. काही वैद्यकीय अधिकारी आपल्या राजकीय ओळखींचा फायदा घेत खासगी प्रॅक्टीस करतात. तर कर्मचारी याच ओळखीचा फायदा घेत विना परवानगी गैरहजर राहणे, कामाच्या वेळात इतरत्र फिरणे असे उद्योग करत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अनेक रुग्णालयातील यंत्र सामग्री बंद आहे तर काही ठिकाणी औषध साठा अपुरा आहे. लसीकरणावर भर देतांना त्याला पूरक असणारी औषधे बाहेरून मागविली जातात, अशी एकंदर स्थिती आहे.

राष्ट्रवादीची निलंबन कायम ठेवण्याची मागणी

मायको दवाखान्यात मोनिका साकेतची प्रसृती रिक्षात झाली. महिलेला वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने स्थानिक महिलांच्या सहकार्याने रिक्षात प्रसुती करण्यात आली. या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी व पाच परिचारिकांना निलंबित करण्यात आले. पुन्हा खातेनिहाय चौकशी होईपर्यंत निलंबन रद्द करून मग निर्णय घेतला जाईल असे सांगितले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना पाठिशी घालण्याचा डाव लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली. आयुक्तांनी निलंबन रद्द केले जाणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहर अध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, नगरसेविका उपस्थित होते.

रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव

महापालिकेला २५० हून अधिक वैद्यकीय अधिकारी व अन्य वर्गाच्या मनुष्यबळाची गरज आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, परिचारिका, सफाई कामगार आदींचा समावेश आहे. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. निवेदने दिली. आरोग्य विभागाच्या डॉकेटमध्ये सूचना केल्या. मात्र परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

डॉ. विजय डेकाटे (आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका)