अनिकेत साठे

जलस्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर

दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्ह्य़ातील २६३ टँकर जिथून पाणी आणतात, त्यातील काही स्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी पुरविण्यासाठी नवे पर्याय शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या टंचाईग्रस्त गावांना दोन ते १० किलोमीटर अंतरावरील स्रोतातून पाणी दिले जाते. त्या ठिकाणचे पाणी संपुष्टात आल्यास चार ते पाच तालुक्यांत टँकरसाठी सभोवतालचे धरण किंवा अन्य स्रोतातून पाणी आणावे लागणार आहे.

सद्यस्थितीत २०० गावे आणि ६७९ वाडय़ांना टँकरने पाणी दिले जाते. २०११ च्या लोकसंख्येनुसार टँकरद्वारे पाणी दिले जात असल्याने ते अपुरे पडत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. दुष्काळग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी यंत्रणेने १०३ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

त्यातील ५५ विहिरी गावांसाठी असून उर्वरित ४८ विहिरी टँकरसाठी आहेत. या विहिरींमधून संबंधित गावांना टँकर किंवा पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. बागलाण तालुक्यात टँकर भरण्यासाठी हरणबारी धरणाखालील विहीर, लेंडीनाल्याखालील विहीर, आराई, ठेंगोडा, दसाणे, मुंगसे परिसरातील खासगी विहिरींचा आधार आहे. चांदवड तालुक्यात संतुलन जलकुंभ, देवळ्यात महालपाटणे आणि खुंटेवाडी येथील खासगी विहीर, मालेगाव तालुक्यात तळवाडे धरणाखालील बाजूकडील, येसगाव खुर्द आणि संगमेश्वर, चंदनपुरी परिसरातील पाच उद्भव विहिरी आणि १५ कूपनलिकांमधून टँकरमध्ये  पाणी भरले जाते. नांदगावमध्ये कासारी, माणिकपूंज धरणासह नागासाक्या धरणातील कूपनलिका, सुरगाणा तालुक्यात तीन खासगी विहिरी, सिन्नर तालुक्यात एमआयडीसी, येवला तालुक्यात नऊ खासगी विहिरीतील उद्भव हे टँकरला पाणी भरण्याचे स्रोत आहेत.

दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने नांदगाव, येवला, मालेगाव, चांदवडसह सिन्नरच्या काही भागात अधिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. टँकरचे सध्याचे काही स्रोत कोरडे पडतील. हे स्रोत संपुष्टात आल्यास परिसरात अन्य स्रोत शोधावे लागतील. विहिरी, विंधन विहिरीतील पाणी खोलवर गेले आहे. जलस्रोतांच्या स्थितीचा आढावा घेऊन जिथे अडचणी उद्भवू शकतात, तिथे पर्यायी स्रोत शोधण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. अनेक ठिकाणी सभोवतालचे धरण आणि तत्सम स्रोत शोधावा लागण्याचे संकेत यंत्रणेने दिले आहेत. सध्याच्या स्रोतांच्या तुलनेत नवे स्रोत दूर अंतरावर असतील. त्यामुळे टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

टँकरच्या रोज ६४० फेऱ्या

नऊ तालुक्यांतील २०० गावे आणि ६७९ वाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी २६३ टँकर दररोज ६४० फेऱ्या करत आहेत. फेऱ्यांचे हे प्रमाण सर्वाधिक नांदगावमध्ये १३४, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वात कमी तीन इतके आहे. चांदवडमध्ये टँकरला ३०, देवळा २१, मालेगाव १२१, सुरगाणा सहा, सिन्नर १२६, येवला तालुक्यात ९६ फेऱ्या माराव्या लागतात. प्रशासनाने टँकरच्या ६७७ फेऱ्या मंजूर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याहून कमी म्हणजे ६४० फेऱ्या रोज होतात. सध्याचे जलस्रोत आटल्यास टँकरला दूरवरून पाणी आणावे लागेल. त्यात होणाऱ्या कालापव्ययाने टँकरच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची धास्ती व्यक्त होत आहे.

जिल्ह्य़ातील चार ते पाच तालुक्यांत गंभीर स्थिती आहे. ज्या स्रोतातून टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्यातील काही स्रोत कोरडे पडण्याची शक्यता आहे. सध्या टंचाईग्रस्त गावांना जवळच्या स्रोतातून पाणी दिले जाते. ते बंद झाल्यास पर्यायी स्रोत शोधण्याची तयारी प्रगतीपथावर आहे. पुढील काळात टँकरला अधिक लांबवरून पाणी आणून ते गावांना पुरवावे लागेल.

– डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.