छगन भुजबळ यांचे तुरूंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र

काळा पैसा जमविल्याच्या प्रकरणात कारागृहात असणारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आता कारागृहातून सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांवर पत्राद्वारे शरसंधान साधण्यास सुरूवात केली आहे. नाशिक जिल्ह्णाातील मांजरपाडा प्रकल्प रखडल्यावरून आधी पत्र पाठवणाऱ्या भुजबळ यांनी आता महात्मा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीकडे राज्य शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याची तक्रार केली आहे.

जवळपास महिनाभरापासून कारागृहात असणाऱ्या भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पहिल्या पत्रात अधिवेशन चुकल्याची रुखरुख नमूद केली होती. आता महात्मा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीचा मुद्दा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ जयंती देशभरात आणि महाराष्ट्रात मोठय़ा जल्लोषात साजरी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. थोर समाज क्रांतीकारक महात्मा फुले यांची २८ नोव्हेंबर २०१७ रोजी १२५ वी पुण्यतिथी आहे. राज्य शासनाने हे शतकोत्तर रौप्यस्मृती वर्ष मोठय़ा प्रमाणात पाळावे अशी विनंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून लेखी स्वरुपात केली होती. परंतु राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष करून २८ नोव्हेंबर २०१६ ते २८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीसाठी काहीही नियोजन केले नसल्याचे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. अशा प्रकारचे दुर्लक्ष महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी विचारांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे राज्य शासनाने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजूनही लक्ष देऊन नियोजनबध्द कार्यक्रम आखावेत, अशी मागणी भुजबळ यांनी पत्रात केली आहे.