जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कळवण / निकाल विश्लेषण

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीद्वारे तालुक्यातील आपल्या वर्चस्वाला कोणताही धोका नसल्याची चाचपणी करून घेतली असून गट आणि गण दोघांमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीखालोखाल काँग्रेसने यश मिळविले असून प्रत्येक गट व गणात उमेदवार उभे करणाऱ्या माकप, भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी नाकारल्याने त्यांना आत्मचिंतन करणे भाग पडले आहे.

तालुक्यातील तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गण ताब्यात ठेवत राष्ट्रवादीने आपला दरारा कायम ठेवला आहे. काँग्रेसने आपला पारंपरिक अभोणा गट दोन्ही गणांसह ताब्यात ठेवला. माजी मंत्री ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार व दोन्ही स्नुषा जयश्री पवार, भारती पवार यांनी विजय मिळविल्यामुळे पवार कुटुंबात तीन सदस्य झाले आहेत. मानूर, कनाशी, खर्डेदिगर गटासह राष्ट्रवादीने नऊ गण मिळविले असून एकमेव अभोणा गण काँग्रेसकडे गेला. या निवडणुकीनिमित्त कळवण तालुक्यात पवार परिवाराने आपले वर्चस्व पुन्हा मिळविले असून आगामी विधानसभेची नांदी म्हणून जिल्हाभर लक्ष लागलेल्या कनाशी गटात नितीन पवार यांनी खासदारपुत्र समीर चव्हाण यांचा धुव्वा उडविला. एवढेच नव्हे, तर समीर यांना अनामतही गमवावी लागली. या ठिकाणी काँग्रेसचे काशिनाथ गायकवाड यांनी साडेसात हजार मतांची मजल मारत शेवटच्या फेरीपर्यंत नितीन पवार यांना टक्कर दिली.

योग्य प्रचार यंत्रणा राबविणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकही मोठय़ा नेत्याची सभा न घेतल्यामुळे व तुलनेने भाजपने विविध नेत्यांच्या सभा घेतल्यामुळे तालुक्यात काही तरी फेरबदल होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु, दस्तुरखुद्द खासदारांनी येथे तळ ठोकूनही त्यांना स्वत:च्या मुलाचा पराभव टाळता न आल्याने तालुक्यात भाजपला सपाटून मार खावा लागला. सर्व जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. या तालुक्याचे आमदार असलेले जे. पी. गावित यांनीही चार गट आणि आठ गणांत उमेदवार उभे करून दोन्ही काँग्रेसला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पक्षाच्या १० उमेदवारांना आपली अनामतही वाचविता न आल्यामुळे मतदारांनी आमदारांनाही कळवण तालुक्यात निष्प्रभ ठरविले.

मतदारांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या हातात तालुक्याची सत्ता दिली. काँग्रेसचे यशवंत गवळी यांनीही पारंपरिक अभोणा गट व दोन्ही गण राखून आपले गटातील वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीच्या निमित्ताने नितीन पवार यांच्या रूपाने तालुक्याला आमदार ए. टी. पवारांचा वारसदार मिळाल्याची चर्चा असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीकरिता चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे. याशिवाय माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या लहान स्नुषा डॉ. भारती पवार यांनी तालुक्यातील मानूर गटात निवडून येत राजकारणात पदार्पण केले. तब्बल १० हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे. दरम्यान पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या कनाशी गटात ११४२७ मते मिळवून विजयी झालेले नितीन पवार यांना काँग्रेसचे काशिनाथ गायकवाड यांनी जोरदार टक्कर दिली. गायकवाड यांनी ७७८३ मते मिळविली. पवार यांचा विजय झाला असला तरी गायकवाड यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात घेतलेले मताधिक्य पवार कुटुंबाला विचार करायला लावणारे आहे.

राष्ट्रवादीची प्रगती

मागील निवडणुकीत तीन गट आणि चार गण ताब्यात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीने सहा गणांत विजय मिळविला असून गतवेळच्या तुलनेत राष्ट्रवादीने दोन गणांची प्रगती केली आहे. गतवेळी एक गट व तीन गण ताब्यात ठेवणाऱ्या काँग्रेसने या वेळी एक गण गमावला. नेहमीप्रमाणे भाजप, माकप व शिवसेनेला भोपळा फोडण्यात अपयश आले. केंद्रातील भाजप-सेना युतीने घेतलेल्या काही निर्णयांचा अप्रत्यक्ष फटका भाजप-सेनेला बसला असून आमदारांनी गत वर्षांत न केलेल्या विकासकामांमुळे माकपला फटका बसला आहे.