कन्हैय्या कुमारचा प्रश्न; केंद्र सरकारवर टीकास्त्र

देशाच्या पंतप्रधानांची ५६ इंची छाती आहे. केंद्रात भाजपचे शासन आहे. देशातील १८ राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. असे असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणात दोषारोपपत्र सादर करण्यास भाजप का कचरत आहे, असा प्रश्न विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याने केला. पंतप्रधान तीन लाख कोटींचा काळा पैसा परत मिळविल्याचा दावा करतात. मग अहमदाबाद-मुंबई बुलेट रेल्वेसाठी जपानकडून एक लाख कोटींचे कर्ज घेण्याची नामुष्की का ओढवली, यासह विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. सभास्थळी कन्हैय्या कुमारच्या साथीने ‘हमें चाहिए आझादी..’चे सूर उत्साहात आळवण्यात येत होते.

छात्रभारती विद्यार्थी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र युवा परिषदेसह अन्य समविचारी संघटनांच्यावतीने रविवारी येथे आयोजित संविधान जागर सभेत कन्हैय्या कुमार बोलत होता. सभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीदेखील भाषण सुरू असताना एकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. कन्हैय्या कुमार याने पंतप्रधान आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला. सत्य बोचणारे असते. देशातील तरुणांनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपने देशभक्त-देशद्रोही असा वाद निर्माण केला. निश्चलनीकरणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना चोर म्हणून हिणवले गेले. नोटा बदलण्यासाठी रांगेत प्राण गमावणारे, अतिकामाच्या ताणाने जीव गमवणारे बँक अधिकारी-कर्मचारी चोर होते काय? निवडणुकीत भाजपने भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा बनविला. सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार सदाचार बनला. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सरकारने १६ महिन्यांत १९ वेळा वाढ केली. निश्चलनीकरण व जीएसटीच्या निर्णयाने छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय बंद पडून बेरोजगारी वाढली. महागाईचे चटके बसत आहेत, असा आरोप केला.