केबीसी घोटाळा तपास
गुंतवणूकदारांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घालणारा केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणने गुन्ह्य़ातील रकमेतून खरेदी केलेले सुमारे पाच किलो सोने बँकेत तारण ठेऊन कर्ज घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. ही मालमत्ता गुन्ह्य़ातील असल्याने पोलिसांनी ती जप्त केली. या सोन्याचे बाजार मूल्य तब्बल दीड कोटी रुपये आहे.
पोलीस कोठडीत असलेला भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती यांनी लॉकरमध्ये दडविलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी तपास यंत्रणाही चकीत झाली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत या दोघा संशयितांकडून तब्बल १८ किलो ९३१ ग्रॅम सोने आणि दोन किलो ३०० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. या सोन्या-चांदीचे बाजार मूल्य सुमारे सात कोटींच्या घरात आहे. अल्प काळात गुंतवणूक दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत राज्यभरातील हजारो गुंतवणुकदारांना केबीसी कंपनीने गंडा घातला. या घोटाळ्यातील मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना अटक झाल्यानंतर तपास यंत्रणा संबंधितांच्या नावे वेगवेगळ्या बँकांमध्ये असणाऱ्या लॉकरची छाननी करत आहे. त्यात आतापर्यंत वेगवेगळ्या लॉकरमधून सुमारे १४ किलो सोन्याची नाणी व दागिने तसेच सव्वा दोन किलो चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या. तपासात बुधवारी वेगळीच माहिती पुढे आली. गुन्ह्य़ातील रकमेतून भाऊसाहेबने सुमारे पाच किलो सोने खरेदी केले होते. ते लॉकरमध्ये न ठेवता सहकारी बँकेत गहाण ठेऊन त्याने कर्ज काढले. ही बाब निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी संबंधित बँकेतून ते सोने जप्त करण्याची कारवाई केली.