28 January 2021

News Flash

नाशिकमध्ये आजपासून नवीन नियमांसह खो-खो प्रीमियर लीग

सहा संघांमध्ये खेळाडूंची विभागणी

नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये खो-खो प्रीमियर लीगसाठी तयार करण्यात आलेले मैदान.   (छाया- सचिन निरंतर)

खेळ गतिमान करण्यासह खेळाडूंच्या कौशल्याला अधिक वाव मिळावा यासाठी जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने नवीन नियमांसह ८ ते १० जानेवारी या कालावधीत खो—खो प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी भारतातील पहिल्या खो—खो लीगचे यशस्वी आयोजन नाशिक जिल्हा खो—खो संघटनेने केले होते.

स्पर्धेचे उद्घाटन प्रभाग समिती सभापती वैशाली भोसले यांच्या हस्ते होणार असून सर्व सामने सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहेत. आदिवासी आणि जिल्हा परिषद शाळेतील खो—खो खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यत्वे या लीगचे आयोजन करण्यात आले आहे .

गेल्या वर्षी खो—खो लीगमध्ये मैदानात बदल करण्यात आला होता. तसेच संरक्षक तुकडी तीनऐवजी चार खेळाडूंची केली होती. प्रत्येक संघात चार मुलींचा समावेश होता. त्यापैकी प्रत्यक्ष सामन्यात तीन मुली खेळणे अनिवार्य केले होते. तसेच संरक्षक प्रत्येक तुकडीमध्ये एका मुलीचा समावेश केला होता. यंदाच्या लीगमध्येही काही नवीन नियम करण्यात आले आहेत.  खो—खो मैदानात कायम दोन रेषा आखलेल्या असतात. त्याऐवजी यंदा एक रेषा आखून सामने खेळविण्यात येणार आहेत. संरक्षक तुकडी तीनऐवजी दोन खेळाडूंची असणार आहे. नऊ मिनिटांच्या चार डावांऐवजी सहा मिनिटांचा तीन डावांचा एक सामना खेळविण्यात येईल. गुणपत्रिकेवर प्रत्येक डावात किती खो दिले, किती नियमोल्लंघन झाले; त्याचा स्वतंत्र उल्लेख करण्यात येणार आहे.

खेळाडूंची तीन मुलांच्या आणि तीन मुलींच्या संघामध्ये विभागणी करण्यात आली आहे . दोन्हीही गटांत राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग आहे. यात भरत पुरस्कार विजेता चंदू चावरे, वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता दिलीप खांडवीसह मनोज पवार, संजय गावित, वनराज जाधव, गणेश राठोड, चिंतामण चौधरी, भगवान गवळी, यशवंत वाघमारे असे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी असणार आहेत. मुलींच्या संघात निशा वैजल, सोनाली पवार, मनीषा पडेर आणि राज्य विजेत्या संघातील कौशल्या पवार, सरिता दिवा, वृषाली भोये, दीपिका बोरसे, ऋतुजा सहारे, सुषमा चौधरी, ताई पवार, विद्या मिरके या मुख्य आकर्षण असणार आहेत.

या लीगमध्ये प्रत्येक सत्रात दोन सामने असे सहा सत्रांत १२ सामने खेळविण्यात येणार आहेत.  मुले आणि मुलीचे संघ प्रत्येकाशी साखळी दोन सामने खेळणार असून जास्त सामने जिंकलेला संघ आणि त्याखालोखाल जिंकलेला संघ अशा दोन संघांमध्ये १० जानेवारी रोजी सायंकाळी अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्यास आकर्षक चषक तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षीस दिले जाणार आहे.

सहभागी संघ आणि कर्णधार

चेतानंद स्ट्राईकर्स – चेतानंद मडावी

मनोजस सोल्जर्स – मनोज पवार

सोनालीज हंटर्स – सोनाली पवार

वृषालीज फायटर्स – वृषाली भोये

दीपिकाज रेंजर्स – दीपिका बोरसे

गणेशज डिफेंडर्स – गणेश राठोड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:53 am

Web Title: kho kho premier league in nashik from today abn 97
Next Stories
1 अवकाळी पावसाने झोडपले
2 अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच
3 झोपडीतून बिबटय़ा थेट पिंजऱ्यात
Just Now!
X