सात लाखाची खंडणी मागणारे अटकेत

वेगवेगळ्या वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या गुन्हेगारी घटनांशी संबंधित कार्यक्रमांची योग्य बाजू घेण्याऐवजी काही तरुण चुकीचा मार्ग अनुसरत असल्याचे उघडकीस आले आहे. सात लाखाच्या खंडणीसाठी तरुणीचे अपहरण करीत तिच्या कुटुंबीयांना धमकावणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. अपहृत मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. संशयित आणि अपहृत मुलगी एकमेकांशी परिचित आहेत. अपहरणनाटय़ात अपहृत मुलीचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर गुन्हेगारी घटनाक्रमाशी निगडित कार्यक्रम पाहून संशयितांनी हे अपहरणनाटय़ रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणारी अपहृत मुलगी सातपूर येथे वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ती अशोक स्तंभ येथे इंग्रजीच्या शिकवणीसाठी गेली होती. शिकवणी संपल्यानंतरही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी शिक्षकांशी संपर्क साधला असता ती नऊ वाजता क्लासमधून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. मुलीचा शोध सुरू असताना दुपारी कुटुंबीयांच्या भ्रमणध्वनीवर संशयित अपहरणकत्याने संपर्क साधला. मुंबईच्या वडाळा येथून वसीम बोलत असून मुलगी परत हवी असल्यास सात लाख रुपये तयार ठेवावेत, असे धमकाविण्यात आले. यावेळी संशयितांनी अपहृत मुलीचे कुटुंबीयांशी बोलणे करून दिले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीला मारण्याची धमकी दिली. यामुळे धास्तावलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, साहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहिती काढली. ज्या भ्रमणध्वनीवरून संशयित संपर्क साधत होते, तोदेखील एका व्यक्तीचा चोरलेला होता. संबंधिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचे रेखाचित्र तयार करण्यात आले. काही संशयितांचे नाव, पत्ते मिळवित पोलीस पथकांनी शोधसत्र सुरू केले.

त्या अंतर्गत अल्पवयीन मुलासह साहिल भांगरे (२०, पाथर्डी फाटा) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहृत मुलीची पाथर्डी फाटा येथील घरातून सुटका करण्यात आली. संशयितांनी भ्रमणध्वनी चोरल्याचे कबूल केले. अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयितांना अटक केल्याची माहिती आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अपहरणनाटय़ात मुलीच्या सहभागाची शक्यता

या प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आणि अपहृत मुलगी हे परस्परांना आधीपासून ओळखत होते. मुलगी उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिला ‘मॉडेलिंग’ची आवड आहे. तपासात निष्पन्न झालेले धागेदोरे परस्परांशी जुळतात काय, याची छाननी यंत्रणा करीत आहे. आपली आवड पूर्ण करण्यासाठी मुलीने परिचितांच्या सहभागाने अपहरणनाटय़ घडविले काय, या दृष्टिकोनातून तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.