समाजात अवयव दानाविषयी जनजागृती होत असल्याने अनेकांना नवजीवन मिळत आहे. मागील महिन्यात ‘ग्रीन कॉरिडोर’च्या माध्यमातून अवयव दानाचा नवा आदर्श समोर उभा राहिला. बुधवारी पुणे येथून येथील गरजू रुग्णांसाठी किडनी आणण्यात आली. ती हॉस्पिटलपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या घटनेत योगायोग असा की किडनीदाता पोलीस उपायुक्त असून ज्याला ती बसविली गेली, ती पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आहे.

मागील महिन्यात अवयवदान आणि मानवी अवयवांची वाहतूक वेळेत करण्यासाठी केलेल्या खास व्यवस्थेची अर्थात ‘ग्रीन कॉरिडोर’ची अनुभूती शहरवासीयांनी घेतली होती. बुधवारी याच धर्तीवर पोलिसांच्या सहकार्याने एका गरजू रुग्णावर उपचार शक्य झाले.

हृषीकेश हॉस्पिटलमध्ये हवालदाराची पत्नी किडनीवर उपचार घेत आहे. त्यांच्यासाठी प्रत्यारोपणाकरिता पुण्याहून रुग्णवाहिकेतून किडनी मागवण्यात आली.

या किडनीचा दाता पोलीस उपायुक्त होते. किडनीची वाहतूक पुण्याहून सिन्नपर्यंत निधरेक झाली. मात्र सिन्नर-नाशिक बायपास यासह चौपदरीकरणाच्या कामामुळे सिन्नर ते नाशिकदरम्यान वाहतूक अडथळे लक्षात घेऊन वैद्यकीय

अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांची मदत घेतली. साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सिन्नरहून किडनी अवघ्या २० मिनिटांत नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये येईल अशी व्यवस्था केली.

सकाळी पावणेअकराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये किडनी पोहोचली आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. हृषीकेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे, डॉ. अनिरुद्ध ढोकरे व डॉ. अनिरुद्ध चिमुटे यांनी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

मेंदू मृत संकल्पना समजून घेणे गरजेचे

आपल्याकडे आजही मेंदू मृत ही संकल्पना पुरेशी स्पष्ट नसल्याने अवयवदान करण्यास फारसे कोणी उत्सुक नाही किंबहुना याविषयी गैरसमज अधिक आहेत. नाशिक शहराचा विचार केला तर ५०० हून अधिक रुग्णांना किडण्यांची गरज आहे, १५० रुग्णांचे यकृत खराब झाले आहे. तर काहींना डोळ्यांची गरज आहे. अवयव प्रत्यारोपणात कुटुंबातील काहींचा रक्तगट मिळत नाही यासह अन्य अडचणी आहेत. समाजात गरजूंची संख्या फार मोठी असून दात्यांची संख्या कमी आहे. अवयव कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. ते मानवी शरीरातून मिळतात हे लक्षात घेत अवयवदान व मेंदूमृत रुग्ण याचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.

– डॉ. भाऊसाहेब मोरे (संचालक, हृषीकेश हॉस्पिटल)