मेंदूमृत रुग्णाच्या मूत्रपिंडाचे स्थानिक महिला रुग्णावर प्रत्यारोपणाची नाशिकमधील पहिली शस्त्रक्रिया हृषीकेश रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. दानात मिळालेल्या या रुग्णाच्या अवयवांचा नाशिक व मुंबईतील रुग्णांना लाभ होणार आहे. मेंदूमृत रुग्णाच्या अवयव दानाविषयी स्थानिक वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांमध्ये जनजागृती नाही. तशीच स्थिती अवयवांची गरज भासल्यास त्यांच्या नोंदणीबाबत दिसून येते. या एकंदर स्थितीत मेंदूमृत वडिलांच्या अवयव दानाचा निर्णय घेणाऱ्या मुलाचे वेगळेपण ठळकपणे अधोरेखीत झाले आहे.

मालेगावजळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या उमेश पटेल (४६, नंदुरबार) रुग्णास येथील सुमन सिम्फनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न झाले. या अवस्थेत व्यक्ती जवळपास मृत झालेली असते, परंतु ‘व्हेंटिलेटर’च्या साहाय्याने काही काळ तिचे अन्य अवयव कार्यान्वित राहू शकतात. या काळात नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा उपयोग इतर गरजू रुग्णांसाठी करता येऊ शकतो. मेंदूमृत व्यक्तीचे अवयव काढणे आणि गरजू रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपणाचे नियमन ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’मार्फत केले जाते. नाशिक हे पुण्याच्या झेडटीसीसीच्या कार्यकक्षेत येते. डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला मेंदूमृत जाहीर केल्यानंतर संबंधित रुग्णालयाने सेंटरच्या नोंदणीकृत हृषीकेश रुग्णालयाशी संपर्क साधला. मेंदूमृत व्यक्तीच्या अवयव दानासाठी नातेवाईकांची संमती मिळणे आवश्यक असते. कारण मेंदूमृत व्यक्तीचे अवयव पुढील २४ ते ७२ तास कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे काम करतात. या काळात तातडीने ते काढणे आवश्यक ठरते. या घटनेत डॉक्टरांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा केली गेली. मेंदूमृत व्यक्तीचा मुलगा जयंत पटेल (१९) औषधनिर्माण शास्त्राचे शिक्षण घेतो. वडिलांचे अवयव दान केल्यास गरजू रुग्णांना उपयोग होईल हे लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला.

रुग्णाच्या नातेवाईकांची संमती मिळाल्यावर अवयव काढणे आणि प्रत्यारोपणासाठी समन्वयक केंद्राकडे संपर्क साधून गरजू रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्या वेळी नाशिकमध्ये केवळ एका रुग्णाची मूत्रपिंडासाठी नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुंबईतील केंद्राशी संपर्क साधून तेथील माहिती घेतली गेली. या घडामोडी सुरू असताना हृषीकेश रुग्णालयात डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपण विभागाचे समन्वयक संजय रकिबे, प्रीतम अहिरराव, किशोर बाफना, अनिरुद्ध ढोकरे, शाम पगार या डॉक्टरांनी तयारी सुरू केली होती. नाशिकच्या एका महिला रुग्णास एक मूत्रपिंडाची गरज होती. त्यांना बोलावून घेण्यात आले. मेंदूमृत व्यक्तीच्या शरीरातून दोन मूत्रपिंड, पोटातील रक्तवाहिन्या व डोळे काढण्यात आले. त्यातील एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण लगेच गरजू रुग्णावर करण्यात आले, तर उर्वरित मूत्रपिंड, रक्तवाहिन्या मुंबईच्या रुग्णांसाठी पाठविण्यात आल्या. डोळे नेत्र बँकेकडे सोपविण्यात आले. ही माहिती डॉ. रकिबे यांनी दिली. नाशिकमध्ये अवयव दान व प्रत्यारोपणाबाबत फारशी जनजागृती नाही. बहुतांश डॉक्टरही मेंदूमृत रुग्णाच्या संकल्पनेविषयी अनभिज्ञ आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर मेंदूमृत व्यक्तीच्या अवयव दानाबाबत कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अवयवांची गरज असणारे रुग्णही नोंदणी करत नाहीत.

मेंदूमृत रुग्णाच्या मूत्रपिंडाचे हे नाशिकमधील पहिलेच प्रत्यारोपण ठरले. हा नाशिकमधील दुसरा मेंदूमृत अवयवदाता होता. याच मेंदू मृत रुग्णाचे दुसरे मूत्रपिंड मुंबईच्या रुग्णाला मिळाले. काही वैद्यकीय अडचणींमुळे रुग्णाचे यकृत व हृदय वापरता आले नाही. रुग्णाचे दोन्ही डोळेही दान करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी एका मेंदूमृत अवयवदात्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी मिळाले होते व त्या वेळी पुण्याच्या रुग्णाला त्यांचा उपयोग झाला होता.

– आरती गोखले

(समन्वयक, झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर)