१०० हून अधिक जणांना अटक
शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतीमालास किफायतशीर भाव, दुष्काळग्रस्तांना भरपाई, कामगार कायद्यांचे संरक्षण आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील ट्रॉयकॉम कारखान्याची टाळेबंदी उठवावी आदी मागण्यांसाठी मंगळवारी किसान सभा शेतमजूर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे १०० हून अधिक आंदोलकांनी स्वत: अटक करवून घेतली. या आंदोलनामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
कामगार व कष्टकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी देशभर अभूतपूर्व आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. या पाश्र्वभूमीवर, कामगार व शेतकरी शेतमजूर यांच्यातर्फे जिल्हाभर मोर्चा व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सिटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरूवात झाली.
विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगार व शेतकरी त्यात सहभागी झाले होते. कामगार कायद्यातील कामगारविरोधी आणि मालक धार्जिणे बदल रद्द करा, सध्याच्या कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, खासगीकरणाचे धोरण मागे घ्यावे, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणे, समान कामाला समान वेतन व भत्ते द्यावे, शासनाच्या विविध खात्यातील रिक्तपदे त्वरित भरावी या मागण्यांकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून नवीन कर्ज बँकांमार्फत चार टक्के व्याज दराने द्यावी, दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी जनावरांना चारा व शेत मजुरांना काम, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान, संबंधितांना वीज देयक माफी व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे, एक लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाची दारिद्र्यरेषेखाली गणना करावी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसणारी वन भूखंड आदिवासींच्या नावे करावेत ट्रायकॉम कारखान्याची टाळेबंदी उठवावी आणि वेतनवाढ करून तो सुरू करावा, किमान वेतनाची मागणी केल्यामुळे कामावरून काढलेल्या वैष्णवी ऑटोच्या कामगारांना कामावर घ्यावे आणि फरकासह वेतन करार लागू करावा, या मागणीचे निवेदन शिष्ट मंडळाने प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी रस्त्यात ठाण मांडून घोषणा देण्यास सुरूवात केली. पोलीस यंत्रणेने संबंधितांना ताब्यात घेण्यास सुरूवात केल्यावर घोषणाबाजी टिपेला पोहोचली.