29 February 2020

News Flash

पतंगप्रेमींच्या उत्साहाला हेलकावे

दुपारनंतर आकाश विविधरंगी पतंगांनी भरून गेले. परस्परांचे पतंग काटण्याची स्पर्धा लागली.

पतंग पकडण्याची धावपळ मुलाच्या जिवावर

नाशिक : मकर संक्रातीच्या दिवशी दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर खऱ्या अर्थाने पतंगप्रेमींमध्ये उत्साह संचारला. सकाळी वारा नसल्याने चिंतेचे मळभ होते. दुपारी ते दूर झाले. सकाळी गिरक्या घेऊन पुन्हा जमिनीकडे येणारे पतंग आकाशात झेपावले. ‘गै बोलो रे धिन्ना.’ चा घोष सर्वत्र दुमदुमला. उत्साहाच्या भरात परिस्थितीचे भान न राहिल्याने अपघातही झाले. सिन्नरमध्ये पतंग पकडण्याच्या नादात कठडा नसलेल्या विहिरीत पडून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पतंग पकडण्यासाठी लहानग्यांची सर्वत्र चाललेली धावपळ धोकादायक होती. परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ते पतंगांमागे धावत होते. त्यांचे धावणे वाहनधारकांसाठीही त्रासदायक ठरले.

मकरसंक्रांत म्हणजे पतंगोत्सव. हा उत्सव आबालवृद्ध उत्साहात साजरा करतात. पतंग, मांजा खरेदीसाठी बुधवारी दुपापर्यंत गर्दी कायम होती. बाजारपेठेत मिकी माऊस, गरुड, विमान, धोबी, वटवाघूळ आदी प्रकारच्या पतंगांची खरेदी झाली. मकरसंक्रांतीला पतंगप्रेमींची एकच धूम उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी वारा नसल्याने पतंगोत्सवाचा अपेक्षित आनंद लुटता येतो की नाही याबद्दल साशंकता होती. सकाळी मुले इमारतीच्या गच्चीवर, खुल्या मैदानात पोहोचली. पतंग उडविण्याची त्यांनी धडपड केली. वाऱ्याअभावी त्यांची दमणूक झाली. युवकांनाही पतंग आकाशात पाठविणे दिव्य होऊन बसले.

सकाळी तीन ते चार तास ही स्थिती असताना दुपारी एकनंतर मात्र चित्र बदलले. वाऱ्याचा वेग जसजसा वाढला, तसा पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला. पतंगोत्सवात पांडा, बरेली, फरिदबेग, सहा तारी, नऊ तारी अशा मांजाचा वापर केला गेला. मध्यवर्ती भागातील वाडे आणि काही इमारतींवर खास ढोल अथवा टेपवर गाण्याची व्यवस्था करण्यात आली. काही कुटुंबीयांनी दिवसभर गच्चीवर थांबण्यासाठी भोजन व्यवस्था केली. गतवर्षी वाऱ्याअभावी उत्साहावर विरजण पडले होते. यावेळी त्याची पुनरावृत्ती टळल्याचे समाधान पतंगप्रेमींच्या चेहऱ्यावर होते.

दुपारनंतर आकाश विविधरंगी पतंगांनी भरून गेले. परस्परांचे पतंग काटण्याची स्पर्धा लागली. प्रतिस्पर्धाचा पतंग कापला की ‘गई बोलो रे धिन्ना..’च्या आरोळ्या ठोकल्या गेल्या. सायंकाळी उशिरापर्यंत ही रणधुमाळी सुरू होती. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि पक्ष्यांची होणारी हानी रोखण्यासाठी काही वर्षांपासून पोलिसांसह अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे आले आहेत. नायलॉन मांजाचा वापर, विक्रीवर बंदी आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. पोलिसांनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर नजर ठेवली. या कार्यपद्धतीचा परिणाम नायलॉन मांजाच्या वापरात घट होण्यात झाल्याचे दिसून आले.

सिन्नरमध्ये विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

पतंगोत्सवास दुर्घटनेचे गालबोट लागले. सिन्नरच्या उगले लॉन्सलगतच्या शेतात पतंग पकडण्याच्या नादात आर्यन विलास नवाळे (११) या मुलाचा कथडा नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. परिसरात काही मुले पतंग उडवत होती. कटलेली पतंग पकडण्याच्या नादात आर्यन कथडा नसलेल्या विहिरीत पडला. भेदरलेल्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेऊन ही माहिती दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ३५ फूट खोल विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला. यावेळी आई-वडिलांनी टाहो फोडला.  नाशिक शहरासह ग्रामीण भागातही अनेक जण पतंग पकडण्यासाठी दिवसभर धावपळ करत होते. वाहनांकडे दुर्लक्ष करत बहुतेकांचे लक्ष आकाशातील पतंगांवर खिळलेले होते. पतंगीच्या मागे पळताना मुलांना कुठलेही भान नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले.

येवल्यात उत्साह

येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे. येवला हे पतंगबाजाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याचे प्रत्यंतर मकरसंक्रांतीच्या दिवशी आले. सकाळी असणारा वारा दुपारनंतर अंतर्धान पावल्याने पतंगप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला. पण सायंकाळी पुन्हा नव्या जोमाने पतंग आकाशात पाठविण्याचे प्रयत्न झाले. आबालवृद्धांसह बच्चे कंपनीने पतंग उडविण्याचा आनंद घेतला. युवती, महिलाही पतंग उडविण्यात मागे नव्हत्या. अपेक्षित वाऱ्याची प्रतीक्षा करताना दमछाक झाली. येवल्याचा पतंगोत्सव तीन दिवस चालतो. त्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात. अपेक्षित वारा नसल्याने दुपारी अनेकांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. आमदार सुधीर तांबे यांनी येवल्यात पतंग उडविण्याचा आनंद घेतला. गुरुवारी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील पतंगोत्सवात सहभागी होणार आहेत.

First Published on January 16, 2020 12:34 am

Web Title: kite rush kills the child akp 94
Next Stories
1 पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी प्रशासन सज्ज
2 गुन्हे वृत्त : वाहनचोरीचे सत्र कायम
3 तोफखाना दलाच्या आधुनिकीकरणास वेग
X
Just Now!
X