उद्यापासून सीबीएस परिसरात आंबा महोत्सव

अनेक वर्षांपासून नाशिककरांना कोकणातील अस्सल हापूस आंब्याची गोडी चाखविणाऱ्या कोकण पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आयोजित कोकण आंबा महोत्सवास १५ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. सीबीएसजवळील जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीत हा महोत्सव भरणार आहे.

रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस म्हणून शहरात अनेक विक्रेत्यांकडून इतर राज्यातील आंब्यांची विक्री केली जात असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. बहुतेकांना हापूसच्या आकाराव्यतिरिक्त इतर वैशिष्टय़े माहीत नसल्याने ते विक्रेत्यांच्या भूलथापांना फसतात. हापूस आंब्यांविषयी नाशिककरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना अस्सल कोकणातील हापूस आंबा मिळावा म्हणून कोकण पर्यटन विकास संस्थेच्या वतीने दर वर्षी अक्षय्यतृतीयेच्या पाश्र्वभूमीवर आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

महोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. महोत्सवात कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर, संगमेश्वर, मांजरे, मेर्वी आदी ठिकाणांहून आंबा उत्पादक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काजू, करवंद, जांभूळ, आवळ्यापासून तयार केलेले विविध खाद्य पदार्थ असा कोकणमेवा नाशिककरांसाठी उपलब्ध राहील.  या वर्षी हवामानातील बदलाचा आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असल्याने या वर्षी आंबा उत्पादनात घट झाली आहे. दवाचे अधिक प्रमाण तसेच कडाक्याचे ऊन यामुळे मोहोर मोठय़ा प्रमाणावर गळाला आहे. उष्णतेमुळे देठ वाळत असल्याने कैऱ्या गळून पडत आहेत. प्रामुख्याने कातळवरील बागांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वाढलेली उष्णता आणि कातळ तापत असल्याने जमिनीतील उष्णता वाढत आहे. यामुळे आंब्याची वाढ आणि दर्जा घसरत असताना दर मात्र चढे असल्याचा कोकण पर्यटन विकास संस्थेचे दत्ता भालेराव यांनी म्हटले आहे.

आंबा उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. तसेच दुसऱ्या मोहोराचा आंबा अत्यंत कमी असल्याने २० ते ३० एप्रिल दरम्यान आंबा आवक कमी होईल. हवामानाने साथ दिल्यास मे महिन्याच्या १० तारखेनंतर आंबा चांगला येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिककरांनी आंबा महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन कोकण पर्यटनचे दत्ता भालेराव यांनी केले आहे.