|| अनिकेत साठे

मांगीतुंगी परिसरातील ग्रामस्थांची भावना

राष्ट्रपतींचे सुदामानगरीत स्वागत असल्याचे फलक झळकावत बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील ग्रामस्थांनी आपल्या भागाच्या विकासाअभावी होणारी वेदना अधोरेखित केली. राष्ट्रपती पहिल्यांदाच गावात आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. राष्ट्रपती येणार म्हणून अल्पावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजले. कधी नव्हे तो वीज पुरवठाही सुरळीत झाला. मांगीतुंगी देवस्थानसाठी आवश्यक ती कामे प्राधान्यक्रमाने केली जातात तसेच प्राधान्य स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी दिले जात नसल्याची भावना व्यक्त झाली.

बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे भगवान ॠषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय दिगंबर जैन मूर्ती निर्माण समितीच्यावतीने आयोजित विश्वशांती संमेलनाचे सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश महाजन, गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी उपस्थित होते. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच राष्ट्रपतींचे संमेलनस्थळी आगमन झाले.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी फलक उभारले होते. त्यावर या परिसराचा उल्लेख सुदामानगरी करून ग्रामस्थांनी आपली स्थिती दर्शविल्याचे शिक्षक पंकज भामरे यांनी सांगितले. मांगीतुंगी तीर्थक्षेत्र परिसरात भिलवाड, दसवेल, पिंपळकोठे, बाडणे आदी गावे आहेत. उंच डोंगरावर भाविकांना डोलीतून नेण्याचे काम १०० ते १५० स्थानिक युवक करतात. आता मूर्ती निर्माण समितीने डोंगरावर जाण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था केल्यामुळे युवकांची डोली बंद होऊन रोजगार कायमस्वरुपी बुडाल्याकडे भामरे यांनी लक्ष वेधले. मूर्ती निर्माण समितीने ५१ हजार झाडे लावण्यासह स्थानिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यापैकी काही झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. देवस्थानसाठी जलदपणे रस्ते, पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा आदी कामे युद्धपातळीवर करण्यात आली. मंदा पवार यांनी राष्ट्रपती आल्याचा नक्कीच आनंद झाल्याचे नमूद केले. यामुळे बरीच कामे झाली. पण ती कायमस्वरुपी नसतात. नेहमी सुरळीत वीज मिळत नाही. रस्ता रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांची जागा घेतली जाते, परंतु भरपाई मिळत नसल्याची तक्रार पवार यांनी केली.

भाविकांची पायपीट

कार्यक्रम स्थळाकडे जाणारी वाहने सुरक्षिततेच्या दृष्टीने अडीच किलोमीटर आधीच थांबविण्यात आली. उपरोक्त ठिकाणी संयोजकांनी भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तिथून कार्यRम स्थळाकडे जाण्यासाठी संयोजकांनी वाहन व्यवस्था केली. दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढली आणि वाहने अपुरी पडू लागली. कार्यRम स्थळाकडे गेलेली वाहने लवकर परतत नव्हती. वाहनांची प्रतीक्षा करुनही उपयोग नसल्याने शेकडो भाविकांना भर उन्हात पायपीट करावी लागली.

मांगीतुंगीमुळे परिसराचा विकास

मांगीतुंगी तीर्थक्षेत्रामुळे सभोवतालच्या गावांचा मोठय़ा प्रमाणात विकास होत असल्याचा दावा मूर्ती निर्माण समितीने केला. संमेलनस्थळी ध्वनिक्षेपकावरून त्याबाबतची माहिती दिली जात होती. कर्मयोगी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनी मूर्ती निर्माण समितीच्या सोहळ्याला शासनाने भरभरून मदत केल्याचे सांगितले. दुष्काळी भागात पाणी नाही. मुख्यमंत्रांनी थेट धरणातून पाणी देऊन हा प्रश्न सोडविला. पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रम रखडला आहे. त्याची पूर्तता करावी आणि मुंबईत विश्वशांती अहिंसा केंद्रासाठी शासनाने जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.