काँग्रेसचे नगरसेवक रवाना, राष्ट्रवादीही तयारीत; महापौर निवडणुकीचे राजकारण

महापालिकेत भाजप विरोधात विरोधक एकवटण्याच्या तयारीत असल्याने चुरशीच्या झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत नऊ, तर उपमहापौर पदासाठी ११ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. दुसरीकडे भाजप, शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस आघाडीने आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवण्याची तयारी केली. परंतु, नगरसेवकांना सहलीला पाठवण्याची गरज आहे की नाही, यावर उभयतांमध्ये एकवाक्यता नसल्याने सोमवारी दिवसभर घोळ घातला गेला. सायंकाळी काँग्रेसचे सहा नगरसेवक सहलीला गेले. राष्ट्रवादीची अनिश्चितता रात्री उशिरापर्यंत कायम राहिली. मनसेची भूमिका गुलदस्त्यात आहे. विरोधकांची मोट बांधली जाईल की नाही, हे अजूनही अनिश्चित आहे. भाजपचे नगरसेवक कोकणात भ्रमंती करत आहे. मंगळवारी त्यांचा उमेदवार निश्चित होईल, असे सांगितले जाते.

महापौर, उपमहापौर पदासाठी २२ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. महापालिकेत भाजपचे ६५, शिवसेना ३४, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी सहा, मनसे पाच, अपक्ष तीन आणि रिपाइं एक असे बलाबल आहे. विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने वेगळा मार्ग पत्करल्याने राज्यात सत्तेपासून भाजप दुरावण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने सेना राज्यात सत्ता ग्रहण करण्याच्या मार्गावर आहे. या घडामोडींमुळे भाजप सावध होऊन खबरदारी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी बहुतांश नगरसेवकांना सहलीसाठी रवाना करण्यात आले. सानप समर्थक काही नगरसेवक सहलीत सहभागी झाले नसल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. संबंधितांना पुन्हा पक्षाच्या तंबूत आणण्याची धडपड केली जात असली तरी त्यास अद्याप पूर्णत: यश मिळालेले नाही. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी काही नगरसेवक कामांमुळे नाशिकला थांबलेले असल्याचे सांगितले. महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाही. पक्ष नेतृत्वाकडून अंतिम क्षणी नांव जाहीर केले जाईल. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. निवडीवरून पक्षामध्ये धुसफूस वाढू नये म्हणून भाजप सावधपणे पावले टाकत आहे.

शिवसेना सर्वपक्षियांच्या साथीने भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा असे एकूण १२ नगरसेवक आहेत.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सोबत यावे, असा प्रस्ताव दिला गेला. सोमवारी दुपारी हे नगरसेवक सहलीला जाणार होते. परंतु, सायंकाळपर्यंत ते गेले नाहीत. या संदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एकत्रित असल्याने सहलीला पाठवण्याची गरज वाटत नसल्याचे सांगितले. काँग्रेसकडून प्रस्ताव आल्याने त्यावर विचार करण्यात आला. सहलीला संयुक्तपणे जावे लागले तरी जवळचे ठिकाण शोधले जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीला जाणार असल्याचे सांगितले. सायंकाळी काँग्रेसचे नगरसेवक रवाना झाल्याचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले.

मनसेचे पाच नगरसेवक असून ते सहलीला जातील की नाही, याविषयी साशंकता आहे. या सर्व नगरसेवकांनी सोमवारी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली.

मनसेची भूमिका गुलदस्त्यात

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २० किंवा २१ नोव्हेंबरला निर्णय घेणार आहेत. त्यांच्या आदेशाचे पालन मनसेचे नगरसेवक करतील, असे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले. महापौरपदासाठी इच्छुक सर्व पक्षाच्या उमेदवारांकडून मनसेशी संपर्क साधला जात आहे. परंतु, कोणाच्या बाजूने उभे रहायचे हे मनसेचे प्रमुख ठरवतील. प्रमुख पक्षांचे नगरसेवक सहलीला गेले आहेत किंवा निघाले आहेत. परंतु, मनसेने अद्याप तसे सहलीचे नियोजन केलेले नाही, असेही शेख यांनी सूचित केले.

महापौरपदासाठी नऊ अर्ज वितरित

महापौर पदासाठी आतापर्यंत नऊ जणांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपचे दिनकर पाटील, स्वाती भामरे, कमलेश बोडके, गणेश गिते, अरूण पवार, प्रियंका घाटे, शिवाजी गांगुर्डे, तर शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर, काँग्रेसकडून शाहू खैरे यांचा समावेश आहे. उपमहापौरपदासाठी ११ जणांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये शोभा साबळे, सलीम शेख, विमल पाटील, शाहू खैरे, कमलेश बोडके, सुप्रिया खोडे, हेमलता पाटील, गणेश गिते, सुषमा पगारे, सुनिता पिंगळे, प्रियंका घाटे यांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर आहे.