लालफितीच्या कारभाराचा फटका

आदिवासीबहुल भागात आरोग्य सेवा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असले तरी या प्रयत्नांना लालफितीचा कारभार मारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे रखडलेले काम लालफितीच्या कारभारामुळे फक्त कागदावरच राहिले आहे. आरोग्य विभाग याबाबत कुठलीही स्पष्ट उत्तरे देत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे.

रुग्णांना गावपातळीवरच किमान प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आखणी आरोग्य विभागाने केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक ग्रामीण रुग्णालय आणि एक उपजिल्हा रुग्णालय आहे. अंबोलीची वाढती लोकसंख्या पाहता अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे विभाजन करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडे मांडण्यात आला. त्यामुळे अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झाले.

तालुक्यातील बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पाहता पहिने ते येलाची मेठ परिसरातील सामुंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरही झाले, मात्र या ठिकाणी जागा न मिळाल्याने डहाळेवाडी येथे हे आरोग्य स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला. डहाळेवाडी येथेही कामास सुरुवात न झाल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राची सद्य:स्थिती काय, याविषयी नागरिक अनभिज्ञ आहेत.

या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. यामुळे आर्थिक पदरमोड होतेच, शिवाय काही जण आरोग्य सेवा घेण्यास दिरंगाई करत आहेत. आरोग्य सभापती यतिंद्र पाटील यांनी लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगितले असले तरी ते कुठे, याविषयी अनिश्चितता आहे.

आरोग्य समितीच्या मागील बैठकीत या विषयावर चर्चा झाली असून मंत्रालय स्तरावरही याबाबत चर्चा झाली आहे. यासाठी आवश्यक निधी आणि अन्य बाबींविषयी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल.    – यतिंद्र पाटील, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद