मागण्यांविषयी कार्यवाहीची विद्यार्थिनींना अपेक्षा

शालेय स्तरावर विद्यार्थिनींचे गळतीचे प्रमाण पाहता ‘स्वच्छतागृहाचा अभाव’ हे कारण प्रामुख्याने पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण-क्रीडा विभागाच्या वतीने समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसह अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षांत मुलींच्या स्वच्छतागृहाचे चित्र पालटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाकडे ‘यू-डायस’मध्ये उपलब्ध माहितीनुसार राज्यात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते १२ वीच्या ६६ हजार ७५० शाळा आहेत. त्यापैकी ६५ हजार १०३ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहेत. परंतु स्वच्छतागृहांची योग्य देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याने त्यांचा सध्या वापर होत नाही. स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने मुली तिकडे जाणे टाळतात. त्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत असून त्यांना वेगवेगळ्या आरोग्यविषयक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहांअभावी मुली शाळाबाह्य़ होत आहेत. नाशिक जिल्ह्य़ाचा विचार केल्यास दोन हजारांहून अधिक जिल्हा परिषद, खासगी शाळांमधून पाच हजारांहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब आहे. अपवाद वगळता खासगी शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने ही स्वच्छतागृहे वापराविना आहेत. मासिक पाळीच्या दिवसात विद्यार्थिनींच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडते. स्वच्छतागृह नसल्याने ग्रामीण भागात मुली घरीच राहतात. या पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्यदायी वातावरण तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळा अनुदानमध्ये स्वच्छता कार्य योजनेसाठी १० टक्के निधी अंतर्भूत असतो. या निधीमधून किंवा लोकसहभाग, उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्वातून प्राधान्याने शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून ती वापरण्यायोग्य राहतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात आरसा, सामान अडकविण्यासाठी हुक, सामान ठेवण्यासाठी मांडणी, कचरा पेटी, पाणी साठवण्यासाठी बादली तसेच मग, हात धुण्यासाठी साबण, प्रकाश अशी व्यवस्था ठेवावी आदी सूचना करण्यात आल्या आहेत.