News Flash

लसीकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा जिल्ह्यास फटका

राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवत असून लसीकरणासाठी आंतरराष्टीय निविदा  काढण्याचे सूतोवाच केले होते

(संग्रहित छायाचित्र)

खासदार डॉ. भारती पवार यांचा आरोप

नाशिक : केंद्राकडून लसींचा योग्य पध्दतीने पुरवठा होत असला तरी राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा उत्तर महाराष्ट्रासह  नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत आहे, असा आरोप खासदार डॉ. भारती पवार यांनी निवेदनातून के ला आहे. करोना संक्रमणाची भयानक परिस्थिती सांभाळतांना राज्य शासनाच्या नाकी नऊ आले असून त्यात केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या मोफत लसीकरणाचा राज्य सरकारच्या अयोग्य नियोजनामुळे पुरता फज्जा उडाला असल्याचे खासदार पवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा स्पष्टपणे दिसत असून लस वाटपाचे  नियोजन हे  ठराविक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे पुरते कोलमडले आहे. त्यामुळे राज्यातील जनता लसीकरणापासून वंचित राहत आहे. अनेक दिवसांपासून राज्याच्या असंख्य केंद्रांवर लस पुरवठ्याचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जात असून त्याचा दोष हा केंद्र सरकारच्या माथी फोडला जात असल्याचे खासदार डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवत असून लसीकरणासाठी आंतरराष्टीय निविदा  काढण्याचे सूतोवाच केले होते. घोषणा करून पंधरवाडा उलटून गेला असून ते फक्त एक आश्वाासनच असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने हीन राजकारण थांबवून न्याय्य रीतीने सर्व जिल्ह्यांच्या गरजेनुसार लसपुरवठा करावा आणि नागरिकांना  सुरक्षित करावे, अशी मागणी खासदार पवार यांनी सरकारकडे केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील  नाशिकसह प्रत्येक जिल्ह्यात लस उपलब्ध करून दिली जावी. जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईत ठिय्या आंदोलन करावे लागेल, असा इशाराही खासदार डॉ. पवार यांनी दिला आहे.

कोणताही भेदभाव नाही

केंद्र सरकारच्या नोंदींनुसार महाराष्ट्रास मिळणाऱ्या लसपुरवठ्यात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात आठ मेपर्यंत एक कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेअसून  १० मे रोजी सकाळपर्यंत केंद्र सरकारकडून एक कोटी ८२ लाख ५२ हजार ४५० मात्रा उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता १० मे रोजी सकाळपर्यंत सात लाख १८ हजार ५६१ मात्रा राज्याच्या हाती असून एक लाख १३ हजार ३३० मात्रा अजून  महाराष्ट्राला  लवकरच मिळणार आहेत . शिवाय सुमारे दीड लाख मात्रांचा पुरवठा केंद्र सातत्याने राज्याला पुरवठा करत आहे. राज्य सरकारच्या नोंदीनुसार दररोज राज्यातील लसीकरणाची संख्या अडीच ते तीन लाख असेल, तर किमान आणखी तीन ते चार दिवस सर्व केंद्रांवर सध्याच्या क्षमतेने लसीकरण सुरळीत होण्यात कोणतीच अडचण नाही. असे असतानाही राज्यातील ठराविक केंद्रे पूर्ण क्षमतेने लसीकरण करत आहेत. काही केंद्रांवर लसीचा खडखडाट आहे. गलिच्छ राजकारणामुळे लसींचा पुरवठा केला जात नसून केवळ राजकारणापोटी ही जाणीवपूर्वक केली जाणारी टंचाई नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 1:53 am

Web Title: lack of vaccination planning hits the district akp 94
Next Stories
1 ‘एचआयव्ही’सह जीवन जगणाऱ्यांना महिंद्रासह यश फाऊंडेशनतर्फे अन्नधान्याची मदत
2 नाशिकमध्ये बुधवारपासून कडक लॉकडाउन; महापालिका प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
3 ‘टोसिलीझुमॅब’चाही काळाबाजार
Just Now!
X