मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने या घाटातील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे मुंबई आणि नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक पोलीस कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून ही दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नाशिकमधील सर्व महामार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात आज (दि.१६) पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. याचा परिणाम मुंबई आणि नाशिक शहरांकडे जाणाऱ्या वाहतूकीवर झाला असून ही वाहतूक अत्यंत संथ गतीने होत आहे.

दरम्यानच्या काळात स्थानिक पोलीस कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचले असून ही दरड हटवण्याचे काम याठिकाणी युद्धपातळीवर सुरु आहे. या महामार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांच्या जुन्या कसारा घाटात दूरपर्यंत रांगा लागल्या असून अत्यंत संथ गतीने वाहतुक सुरु आहे.