होळीची धुळवड झाल्यानंतर रंगपंचमीनिमित्त रंगाची मुक्त हस्ते उधळण करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे नाशिकच्या रंगपंचमीचे वैशिष्टय़ असलेल्या पेशवेकालीन रहाडी खोदण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, शहर परिसरात ठिकठिकाणी रंग, पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पाण्याची नासडी करण्यापेक्षा ‘पर्यावरणपूरक रंगपंचमी’ खेळावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच शहरातील विविध विद्यालयांमध्ये रंगपंचमी खेळण्यात आली.

जिल्ह्य़ात होळीनंतर धूलिवंदनच्या दिवशी वीरांची मिरवणूक काढण्यात येते. धूलिवंदननंतर नाशिककरांचे लक्ष रंगपंचमीकडे लागून असते. रंगपंचमीला नाशिकमध्ये विशेष महत्व आहे. नाशिकची रंगपंचमी ही ऐतिहासिक मानली जाते. शहराच्या विविध भागांत पेशवेकालीन रहाडी असून रंगपंचमीच्या दोन दिवस आधीपासूनच त्या खोदण्यास सुरुवात होते. सोमवारी पंचवटी परिसरातील शनि चौकातील रहाडीचे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आल्यावर खोदकामास सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत रहाडीची स्वच्छता करण्यात आल्यावर ती आयुर्वेदिक रंगमिश्रित पाण्याने भरल्यावर तिचे विधिवत पूजन झाल्यानंतर ती रंगपंचमी खेळण्यासाठी खुली करण्यात येईल. जुन्या नाशिकमधील काही रहाडींची सोमवारी सायंकाळपर्यंत स्वच्छता पूर्ण झाली होती.

शहर परिसरात विविध संस्थांकडून शुल्क आकारात आपल्या आवडत्या कलाकारांसोबत रंगपंचमी खेळण्याची व्यवस्था रेन डान्ससह उपलब्ध करून देण्यात आली आहे. वसाहत परिसरात पाण्याचा टँकर मागवित, तर काही ठिकाणी हौद, ड्रम पाण्याने भरत गाण्यांच्या तालावर नृत्य करीत रंगपंचमींचा आनंद घेण्याचे नियोजन आहे. रंगप्रेमींची ही आवड लक्षात घेऊन बाजारपेठ रंग, रंगाचे साहित्य, पिचकाऱ्या यांनी सजली आहेत. बाजारपेठेत बच्चे कंपनीची आवड लक्षात घेऊन मिकी माऊस, डोरोमॅन, छोटा भीम या कार्टुनच्या आकारातील पिचकाऱ्यांसह तीन, चार शॉटच्या पिचकाऱ्या, शॉवर असे विविध प्रकार ४० पासून ८५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सोमवार दुपारपासून ग्राहकांनी रंग आणि पिचकारी खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती विक्रेत्या अपर्णा शहा यांनी दिली. मागील वर्षांच्या तुलनेत पिचकाऱ्यांच्या किमतीत १५ टक्के वाढ झाली आहे. पिचकाऱ्यांच्या बाबतीत चोखंदळ असणारे ग्राहक मात्र रंगासाठी नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. मातीचे नैसर्गिक रंग १० रुपयांपासून उपलब्ध असून रासायनिक रंग बहुतांश ठिकाणाहून बाद झाल्याचे बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर लक्षात येते. दरम्यान, रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांमध्ये पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात खेळण्यात आली. टिळा होळी किंवा कोरडे रंग खेळत मुलांनी रंग खेळत घराची वाट धरली.

सुकेणे, येवल्यात रंगपंचमीचे सामने

निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे आणि येवला येथील रंगपंचमी विशेष प्रसिद्ध आहे. या दोन्ही ठिकाणी रंगपंचमीचे सामने खेळले जातात. ट्रॅक्टर ट्रॉलीत रंगाने भरलेले पिंप ठेवून दोन गट समोरासमोर एकमेकांवर रंग उधळतात. सुकेणे येथे तर याच दिवशी यात्रोत्सवही असतो. सुकेणे आणि येवला येथे रंगपंचमीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.