नांदुरमध्यमेश्वर धरणातील जलसाठा संपुष्टात आल्यामुळे पाणी टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या लासलगाव शहरात बुधवारी पाण्याचे टँकर न आल्याच्या निषेधार्थ गुरूवारी लासलगावकरांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवत प्रशासकीय यंत्रणेचा निषेध केला.

जवळपास सर्वच व्यावसायिकांची दुकाने बंद राहिल्याने लासलगाव शहरातील नेहमी गजबजणाऱ्या कांजा बाजारपेठेत शुकशुकाट पसरला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिर्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जवळपास १५ दिवसांपासून परिसरातील १६ गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. लासलगाव ही कांद्याची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे दररोज २० हजार नागरिकांना या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. लासलगावमध्ये पाणी टँकर सुरू होणार होते. यासाठी शासनाने बारा हजार लिटर पाण्याच्या फेऱ्या मंजूर केल्या. मागील पाच-सहा दिवसांपासून रजेवर असलेले निफाडचे लघु पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणात जलसाठा असल्याची चुकीची माहिती दिल्याने लासलगांव शहरात सुरू होणारे टँकर सुरू झाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. याबाबत निफाडचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरूळे व तहसीलदार संदीप आहेर यांच्या आदेशानुसार तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने त्याच दिवशी पाणी उपलब्ध असणाऱ्या विहिरी व शेतकरी यांची माहिती देणारा अहवाल दिला. मात्र पाटबंधारे विभागाच्या शेऱ्यामुळे हे सर्व प्रयत्न तोकडे ठरले आणि पाणी आलेच नाही. यामुळे लासलगाव येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच जयदत्त होळकर यांनी दिला. पाणी प्रश्नाबाबत प्रशासनाची असणारी बेपर्वाई याविषयी निवेदन प्रशासनास देण्यात आले. मंगळवारी या प्रकरणी नाशिकचे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नांदूरमध्यमेश्वरला भेट देऊन पाहणी केली. तरीही बुधवारी दिवसभरात टँकर सुरू झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लासलगावच्या नागरिकांनी बंदची हाक देत सर्व व्यवहार बंद ठेवले.