दुर्गसंवर्धनासाठी कार्यरत येथील शिवकार्य गडकोट मोहीम या संस्थेच्या वतीने दुर्गजागृती व्याख्यानमालेंतर्गत १२ एप्रिल रोजी चौथे पुष्प ‘दुर्ग काल आज आणि उद्या’ या विषयावर गुंफले जाणार आहे.
जिल्हा न्यायालयासमोरील शिवपुतळ्याजवळ सायंकाळी सहा वाजता दुर्ग अभ्यासक व लेखक अंकुर काळे हे दुर्गाच्या स्थितीवर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मोहिमेच्या वतीने संकेत नेवकर हे ‘जेव्हा गड बोलू लागला’ हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची माहिती देणाऱ्या ८० भित्तिचित्रांचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. स्वराज्याचे प्रतीक असणाऱ्या गडकिल्ल्यांना जतन करण्यासाठी सामाजिकदृष्टय़ा जागृतीच्या उद्देशाने होणाऱ्या या दुर्गजागृती व्याख्यानमालेत सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने करण्यात आले आहे.