फुटीर २७ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपची याचिका; नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचेही सहाय्य

नाशिक : जळगाव महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून शिवसेनेला मतदान करणाऱ्या २७ फुटीर नगरसेवकांना अपात्र करावे, यासाठी भाजपच्या वतीने येथील विभागीय महसूल आयुक्तांकडे ३० हजार पानांची याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सदस्यांची गटनोंदणी, शपथपत्र, विविध माध्यमांतून पक्षादेश बजावल्याचे दाखले आदी कागदपत्रांचा समावेश आहे. जळगाव महापालिकेत भाजपच्या एकहाती सत्तेला शिवसेनेने सुरुंग लावला. राजकीय पातळीवर रंगलेली लढाई आता कायदेशीर पातळीवर लढली जाणार असून त्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचेही साहाय्य लाभत आहे.

जळगाव महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची २७ मते फोडून १५ सदस्य असणाऱ्या शिवसेनेने दोन्ही पदांवर ताबा मिळविला होता. महापौरपदी जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील विजयी झाले. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी ‘एमआयएम’च्या तीन सदस्यांनी सेनेला साथ देऊन नव्या समीकरणास जन्म दिला होता. भाजपचे खान्देशातील संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या घाऊक बंडाळीनंतर भाजपने फुटिरांना धडा शिकविण्यासाठी कंबर कसली आहे. बुधवारी जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालानी, नाशिक महापालिकेतील भाजपचे गटनेते जगदीश पाटील, अ‍ॅड. सतीश भगत, अ‍ॅड. शरद मेढे यांच्या वतीने ३० हजार पानांची याचिका विभागीय महसूल आयुक्तांच्या न्यायालयात दाखल करण्यात आली.

फुटीर नगरसेवकांसह, जळगाव महापालिका, महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नोंदणीकृत टपाल, सामूहिक ई-मेल, भ्रमणध्वनी, प्रत्यक्ष नगरसेवकांच्या घरी, दारावर पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला होता. त्याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांद्वारे पक्षादेश

प्रसिद्ध करण्यात आला. ऑनलाइन सभेत २७ नगरसेवकांनी विरोधी उमेदवाराचे नाव घेऊन मतदान केले. त्यामुळे भाजपचा अपात्रता अर्ज पूर्णत: मंजूर करावा, २७ नगरसेवकांना नियमांन्वये अनर्ह घोषित करावे तसेच पुढील पाच वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती भाजपने केली आहे.

त्यांनी ठावठिकाणा लपवला

महापौर, उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी विशेष सभेच्या आधीपासून संबंधित नगरसेवक भाजपचे नेते, गटनेते, नगरसेवकांच्या संपर्कात येण्याचे टाळू लागले. त्यांनी आपला ठावठिकाणाही लपवून ठेवला. त्यामुळे भाजपच्या अन्य नगरसेवकांप्रमाणे हे २७ सदस्य पक्षादेश बजावून त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांना विविध माध्यमांतून पक्षादेश बजाविण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.