बच्चू कडू यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान
आमदार होण्यासाठी जातपात, धर्म, पक्षाचा झेंडा अथवा राजकीय घराण्याचा वारसा यापैकी कसलीच गरज नसते. केवळ प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. निवेदन देऊन केलेला ढोंगीपणा नागरिकांना चालत नाही, असे परखड मत अचलपूर-परतवाडय़ाचे आमदार बच्चू कडू यांनी मांडले. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्षम आमदार पुरस्काराने कडू यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विनायकदादा पाटील, प्रा. विलास औरंगाबादकर, अरविंद बेळे, डॉ. शोभा नेर्लीकर, रमेश जुन्नरे उपस्थित होते. ५० हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. माजी आमदार व पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ. शोभा नेर्लिकर व जामात डॉ. विनायक नेर्लिकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराच्या रकमेपैकी १० हजार रुपये अपंगांसाठी तर उर्वरित ४० हजार रुपये विधवांसाठी खर्च करणार असल्याचे कडू यांनी जाहीर केले. विनायकदादा पाटील यांनी समाजाचा समतोल कडू यांच्यासारख्या व्यक्तिंमुळे टिकून असल्याचे सांगितले.
अपंगांसाठी केलेले काम आणि रुग्णसेवा याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही व्यक्तिगत कार्यातील काही खर्च गरिबांसाठीही करावा, असे आवाहन केले. जगात प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. तसे काम केल्यास जनता तुम्हाला डोक्यावर घेईल, असे कडू यांनी नमूद केले. समाजातील अंधश्रध्देवर बोट ठेवताना अंगारे-धुपारे देणाऱ्यांकडे लोक गर्दी करतात. मात्र, ज्या मान्यवरांनी आपल्याला विचार दिले, त्यांचा आपणास विसर पडतो, असे ते म्हणाले. राज्यातील कोणत्याही गरीब व्यक्तीला मोठी शस्त्रक्रिया करायची असल्यास त्याला जमीन विकण्याची गरज नाही. संबंधितांनी आपणास एक दूरध्वनी केल्यास कितीही महागडी शस्त्रक्रिया असली तरी ती मोफत करून दिली जाईल, असे त्यांनी नमूद करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
गरिबांच्या सेवेची संधी दिसण्यासाठी द्रष्टय़ाची नजर लागते. मानव कल्याणासाठी, रंजल्या गांजलेल्यांसाठी कडू काम करत असून एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे बोलणे ऐकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २००३ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराने आतापर्यंत बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, भाऊसाहेब फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात यांना सन्मानित करण्यात आले आहे.