बिबटय़ाने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव खांब फाटा परिसरात घडला. सातपूर येथील आयुर्वेद चिकित्सक संजीव कुमावत (५२) हे सोमवारी रात्री आपल्या दुचाकीवरून पाथर्डी फाटामार्गे नाशिक रोडकडे जात असताना पिंपळगाव फाटय़ाजवळ  रस्त्यालगत असलेल्या जवळच्या रोपवाटिकेतून उडय़ा घेत बिबटय़ा रस्त्यावर आला. त्याने थेट कुमावत यांच्या अंगावर झेप घेतली. कुमावत यांनी हेल्मेट घातल्यामुळे ते वाचले. पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांच्या झगमगाटाला घाबरत बिबटय़ा पुन्हा रोपवाटिका परिसरात पळाला. या अपघातात त्यांच्या मानेला आणि खांद्याला मार लागला. बिबटय़ाही जखमी झाला.

तीन दिवसांपासून परिसरात रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढला असून बिबटय़ाचा वावर असला पाहिजे, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकाराची माहिती शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे यांनी वन विभाग अधिकारी रवींद्र सोनार यांना दिली. मंगळवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करत बिबटय़ाचा वावर असल्याची खातरजमा केली. परिसरात बिबटय़ाच्या पावलाचे ठसे दिसले असून प्रत्यक्षदर्शीशी चर्चा करण्यात आली. परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्यात येईल, अशी माहिती सोनार यांनी दिली.