नाशिक : दारणा नदीकाठ भागातील चाडेगाव शिवारात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटे बिबटय़ा जेरबंद झाला. बिबटय़ांचा परिसरात मोठय़ा प्रमाणात वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यापैकी एक बिबटय़ा पिंजऱ्यात अडकल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

चाडेगाव, सामनगाव हा पूर्णत: मळे विभाग आहे. काम करत असताना शेतकऱ्यांना चाडेगाव शिवाराजवळ बिबटय़ा दिसला होता. वन विभागाला त्याची माहिती दिल्यानंतर नाशिक वनपरिक्षेत्राचे विवेक भदाणे, वन परिमंडळ अधिकारी अनिल आहेरराव यांच्या पथकाने मानकर यांच्या शेतात १२ एप्रिल रोजी पिंजरा लावला. शनिवारी पहाटे डरकाळी ऐकू  आल्याने मानकर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली असता पूर्ण वाढ झालेला बिबटय़ा जेरबंद झाल्याचे लक्षात आहे. किशोर सावकार यांनी माहिती कळविताच वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर जयनाथ गोमटे, वाहनचालक शरद अस्वले यांनी जेरबंद बिबटय़ाला सुरक्षितरित्या वाहनाने गंगापूर येथील रोपवाटिके त वैद्यकीय तपासणीसाठी नेले. यापूर्वी तीन एप्रिल रोजी या भागातून एक बिबटय़ा जेरबंद करण्यात आला होता. अजून एक बिबटय़ा या भागात असून त्याच्यासाठीही पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

बिबटय़ाचे लपण्याचे ठिकाण उसाचे मळे असून ऊस तोडणीचे काम पूर्ण झाल्यामुळे बिबटय़ांना लपण्यास जागा मिळत नसल्याने ते मानवी वस्तीकडे येत आहेत. आर्टिलरी सेंटरच्या जंगल परिसरात दारूगोळा डागण्याचे प्रशिक्षण सुरू असल्याने होणाऱ्या आवाजाला घाबरून बिबटे विचलित होत आहेत. शेतीत काम करणारे शेतकरी, मजूर, कामगार सर्वानी काम करतांना काळजी घेतली पाहिजे. तसेच सायंकाळनंतर घराबाहेर पडतांना सुरक्षितता बाळगण्याची गरज असल्याचे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.