17 November 2019

News Flash

चाडेगाव शिवारातील बिबटय़ा अखेर जेरबंद

बिबटय़ा सर्रास दिवसाही बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिकांनी नमूद केले होते.

नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास

नाशिक : महिनाभरापासून नाशिकरोड परिसरालगत दिसणारा बिबटय़ा बुधवारी पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. धामणगाव-चाडेगाव शिवारात हा पिंजरा लावण्यात आला होता. महिनाभरापासून मनपा हद्दीतील धामणगाव-चाडेगाव शिवारात बिबटय़ाचा वावर असल्याने परिसरातील नागरिक दहशतीखाली होते.

काही दिवसांपूर्वी बिबटय़ाने शेतकऱ्यांच्या बकऱ्या, कुत्री तसेच इतर प्राण्यांचा फडशा पाडला होता. रात्री-बेरात्री होणाऱ्या बिबटय़ाच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती होती. दिवसाही शेतात काम करताना नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागत होती.

बिबटय़ा सर्रास दिवसाही बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिकांनी नमूद केले होते. या पाश्र्वभूमीवर त्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येऊ लागली होती. याबाबत वनविभागाला निवेदन देण्यात आल्यानंतर वनविभागाने परिसराची पाहणी करत निशांत वाघ यांच्या शेताजवळ पिंजरा लावला.

पिंजरा लावल्यानंतर चार दिवस बिबटय़ा तिकडे फिरकला, परंतु पिंजऱ्यात अडकला नाही. बुधवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबटय़ा पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी बिबटय़ाला पाहण्यासाठी गर्दी केली.

वनविभागाने बिबटय़ाला ताब्यात घेतले. सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातून एका बिबटय़ाला ताब्यात घेण्यात आले होते. अद्याप बिबटय़ाची पिले आणि मादी बिबटय़ा परिसरात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

First Published on July 11, 2019 12:33 am

Web Title: leopard caught in nashik road area zws 70