नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमागील द्राक्षशेतीत सोमवारी सकाळी बिबटय़ा मृतावस्थेत आढळला. मृत बिबटय़ा नर असून तो पाच वर्षांचा आहे. त्याच्या मृत्यूचे कारण कळलेले नाही.

आडगाव शिवारातील प्रभाकर माळोदे यांच्या शेतात हा बिबटय़ा आढळून आला. माळोदे हे सकाळी द्राक्षबागेत गेले असता त्यांना बिबटय़ा निपचित पडल्याचे दिसून आले. माळोदे यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबटय़ाचा मृतदेह ताब्यात घेतला. मयत बिबटय़ा नर असून तो पाच वर्षांचा असल्याचे वनपाल अनिल अहिरराव यांनी सांगितले. अन्नातील विषबाधेमुळे बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत निश्चित माहिती मिळेल, असे अहिरराव यांनी सांगितले.

एक ते दोन वर्षांत शहर परिसरात बिबटय़ांचा वावर वाढलेला आहे. अनेकदा बिबटय़ांनी थेट नागरी वस्तीत धुमाकूळ घातला. काही जणांवर हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत. नाशिकरोड परिसरात तर काही महिन्यांत अनेक बिबटे जेरबंद करण्यात आले.

बिबटय़ाला शहरात येण्यापासून रोखण्याचा कोणताही उपाय नाही. शहराच्या आसपासचा परिसर शेतीचा आहे. तिथे शेळी, मेंढय़ा, वासरूसह शहरात कुत्रे आणि तत्सम प्राणी सहज उपलब्ध होत असल्याने बिबटय़ाचा शहरांच्या आसपास वास्तव्य करण्याकडे कल वाढत चालल्याचे दिसून येते.