हल्ल्यात सहा शेळ्या ठार

नाशिक – धुळे जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवर असणाऱ्या बागलाण तालुक्यातील काही गावांमध्ये बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. आठवडाभरात बिबटय़ाच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. त्यात सहा शेळ्या ठार झाल्या.

बागलाण तालुक्यातील शिवकालीन पिसोळ किल्ला, नांदिन, दरेगाव आदी गाव परिसरात जंगल असून तिथे वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. काही महिन्यांपासून जंगलांमधील पाणीसाठा संपुष्टात आल्याने जंगली प्राणी पाण्याकरिता नागरी वस्त्यांकडे वळत आहेत. यात बिबटय़ांची संख्या अधिक आहे. मागील काही दिवसांपासून पूर्ण वाढ झालेला बिबटय़ा बागलाण तालुक्यातील दरेगाव, नांदिन, खडकीपाडे, पिसोळ शिवार, वाडी पिसोळ, जयपूर परिसरात संचार करीत आहे.

बिबटय़ाच्या हल्ल्यात तुकाराम देवरे यांच्या चार शेळ्या ठार झाल्या. तसेच यापूर्वी जिजाबाई देवरे, लहू देवरे यांची प्रत्येकी एक शेळी बिबटय़ाने फस्त केल्याने पशुपालक चिंतेत आहेत. दिवाळीनंतर शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतीच्या प्राथमिक कामांकरिता गावालगतच्या शेतात जावे लागते. मात्र बिबटय़ाच्या संचारामुळे ग्रामस्थ शेतीच्या कामांसाठी बाहेर पडण्यास कचरतात. वीज कंपनी अनेकदा रात्रीच्या वेळी भारनियमन करीत असल्याने बिबटय़ाच्या हल्ल्यात वाढ झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. बिबटय़ांची दहशत लक्षात घेऊन वीज कंपनीने भारनियमन बंद करावे, अशी मागणी पुढे आली आहे. तसेच नुकसान झालेल्या पशुपालकांना तातडीने आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देऊनही वन विभागाचे दुर्लक्ष

बिबटय़ाने यापूर्वी अनेकदा परिसरातील गावांमधील पाळीव जनावरे, कुत्री फस्त केली आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्याने दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बिबटय़ाच्या संचारामुळे पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबटय़ाचा बंदोबस्त करावा याकरिता अनेकदा निवेदने दिली, पाठपुरावा केला. वन विभाग जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. मयूर नेरकर यांनी वन विभागाला निवेदन देऊन उपरोक्त गावांमधील स्थिती कथन केली. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.