नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)समोर वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली.
एचएएल कारखान्यातील वीज उपकेंद्र परिसरातून हा बिबटय़ा महामार्गावर आल्याचा अंदाज आहे. महामार्ग ओलांडून जात असताना वाहनाने बिबटय़ाला उडवले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मयत झालेला बिबटय़ा मादी आहे. साधारणत: ती एक वर्षांची असल्याचे चांदवड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांनी सांगितले. बिबटय़ा वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अनुसूची एकमधील प्राणी आहे. पंचनामा करून मृत बिबटय़ाला उत्तरीय तपासणीसाठी चांदवड वन परिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले. या वेळी वडनेर भैरव वन परिमंडळ अधिकारी देविदास चौधरी, वनरक्षक विजय टेकनार, वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर आणि अनंत वाळे, महामार्ग पोलीस विभागाच्या साहाय्यक निरीक्षक वर्षां कदम आदी उपस्थित होते. एचएएलची ओझर परिसरात हजारो एकर जागा आहे. कारखान्याचे क्षेत्र वगळता उर्वरित परिसर गवताळ आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर झाडीही आहे. त्यामुळे बिबटय़ांसाठी हे ठिकाण सुरक्षित असल्याने येथे बिबटय़ांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 1:34 am