नाशिक : शिकारीच्या शोधात असलेला बिबटय़ा अंदाज चुकल्याने कोरडय़ा विहिरीत पडला. कळवण तालुक्यातील वडाळा (हतगड) वनपरिक्षेत्र परिसरात हा प्रकार घडला. वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा टाकून बिबटय़ाला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. मुख्यालयी मुक्कामी असलेल्या बिबटय़ाला रात्री उशिराने जंगल परिसरात सोडून देण्यात आले.

जिल्ह्य़ात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत असताना वन्यजीवही यास अपवाद नाही. पाण्यासाठी बाहेर पडलेले जीव बिबटय़ाला सहज शिकार म्हणून मिळत आहेत. सोमवारी सायंकाळी कळवण तालुक्यातील वडाळा (हतगड) शिवारात बिबटय़ा सावजला पकडण्याच्या प्रयत्नात कठडे नसलेल्या खोल विहिरीत कोसळला. परिसरातील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सी. आर. कामडी यांना याबाबत माहिती दिली. कामडी यांनी तत्काळ वनअधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

हा प्रकार गावात समजताच मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. वनविभागाने ग्रामस्थांना मदतीसाठी आवाहन केले. विहिरीमध्ये थोडे पाणी होते. त्यामुळे बिबटय़ाला बाहेर काढण्यात अडचण येत होती. विहिरीतील पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु गावात भारनियमन असल्याने जनरेटरचा आधार घेत ऑइल इंजिनने पाण्याचा उपसा करत विहिरीत पिंजरा सोडण्यात आला.

पाच तासांहून अधिक काळ विहिरीतून मोकळ्या जागी येण्यासाठी धडपड करणारा बिबटय़ा पिंजऱ्यात अवघ्या पाच मिनिटात आला. पिंजऱ्यात जेरबंद बिबटय़ास कनाशी येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले. रात्री अंधार पडल्यावर त्याला जंगलात सोडून देण्यात आल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

नर जातीचा बिबटय़ा

वडाळा येथे सहा वर्षांचा नर जातीचा बिबटय़ा आढळला. सावजच्या शोधात बिबटय़ा अपघाताने विहिरीत पडला. वन विभागाने अथक पाच तास प्रयत्न करत बिबटय़ाला पाण्याबाहेर काढले. मुख्यालयी आणल्यानंतर रात्री उशिराने अंधार पडल्यावर जवळच्या जंगलात त्याला सोडून देण्यात आले.

– सी. आर. कामडी, वनक्षेत्रपाल, कनाशी