नाशिकच्या इंदिरानगर भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून त्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बिबट्याने केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकारामुळे या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, नाशिक शहरातील इंदिरानगर भागातील राजसारथी सोसायटीममध्ये बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. शनिवारी पहाटे या बिबट्याने या भागात घराजवळच एका व्यक्तीवर हल्ला चढवला. तर दुसऱ्या एका घटनेत पायी चालणाऱ्या एका व्यक्तीवर समोरुन धावत येऊन थेट हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱॅत कैद झाले आहे.

टाळेबंदीत सायंकाळनंतर होणारी शांतता वन्य प्राण्यांना शहराकडे घेऊन येत आहे. शुक्रवारी शहरातील कॉलेजरोड परिसरात महिलेवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पहाटे इंदिरानगर भागात पुन्हा दोघांवर हल्ला केला. राजसारथी सोसायटीत ही घटना घडली. निवासी भागात शिरलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

कॉलेज रोडच्या घटनेनंतर वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलच्या परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला. पहाटे तो इंदिरानगर भागात पोहोचल्याचा अंदाज आहे. सकाळी फिरण्यासाठी बाहेर निघालेल्या सुपडू आहेर या ज्येष्ठ नागरिकावर बिबट्याने जिन्यामध्ये हल्ला केला. नंतर राजसारथी सोसायटी लगतच्या रस्त्याने पायी जाणाऱ्या अन्य एका व्यक्तीवर हल्ला चढविला. वन विभागगाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरू आहे.