अनेक तालुक्यांमध्ये बिबटय़ांचा संचार कायम 

नाशिक : जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात एकीकडे करोना महामारीविरोधात ग्रामस्थांचा लढा सुरू असतांना दुसरीकडे अनेक तालुक्यांमध्ये बिबटय़ांचा संचार कायम असल्याने शेतशिवार, वस्तींवरील शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. बिबटय़ांचा सर्वाधिक वावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटय़ाची मादी अडकली. दुसरीकडे खैरगाव येथे वृध्द महिलेचा बळी घेणारा बिबटय़ा अजूनही मोकाटच आहे.

काही दिवसांपूर्वी अडसरे परिसरात कु त्रा, आठ ते दहा शेळ्या फस्त करून शेतकऱ्यांची झोप उडविणारा बिबटय़ा जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. बुधवारी त्या पिंजऱ्यात दोन ते अडीच वर्षांची बिबटय़ा मादी जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी काहीसा नि:श्वास सोडला. दुसरीकडे, खैरगाव येथील परिसरात वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे बिबटय़ाच्या मार्गावर लावण्यात येऊनही अद्यप बिबटय़ा त्या पिंजऱ्यापासून दूर आहे. तिसरा पिंजरा आणि बिबटय़ाच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे या परिसरात लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाचे भाऊसाहेब राव यांनी दिली.

आजही त्या बिबटय़ाचा मागोवा घेण्यासाठी  खैरगाव, शेनवड, खडकवाडी, देवळा आदी परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने गस्त केली. खडकवाडी परिसरात बिबटय़ाला पहिल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला दिली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. परंतु, बिबटय़ा न आढळल्याने कर्मचारी हतबल झाले.