पावसाचे पाणी साठविण्याची तयारी

नाशिक : पावसाळयाच्या पाश्र्वभूमीवर, देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २० ते ३० जून या कालावधीत पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी अभियान राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. याविषयी आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र जिल्ह्य़ातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून प्राप्त झाले असून २२ जून रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन पंतप्रधानांच्या पत्राचे वाचन करण्यात येणार आहे.

हे अभियान राबविण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पावसाचे पाणी साठवणुकीसाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये श्रमदानातून बांध-बंदिस्ती, नदी, ओढय़ात बांध टाकणे, गाळाचा उपसा करणे, तलावांचे खोलीकरण, सफाई, वृक्षारोपण आदी काम करावयाची आहेत. यासाठी २२ जून रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घ्यावयाची असून त्यामध्ये पंतप्रधानांचे पत्र सर्वाना वाचून दाखवायचे आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मराठी भाषेतील आवाहन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नावाने स्वतंत्र पत्र प्राप्त झाले असून जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या प्रती सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावरून सर्व ग्रामपंचायतींना या पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या बैठका घेऊन अभियानाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पाणी-स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.