जिल्हा परिषदेच्या उपक्रमात ४१ हजार पुस्तके प्राप्त

नाशिक : गावागावात वाचनालयाची निर्मिती करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ‘पुस्तक दान करा’ (डोनेट अ बुक) हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत आतापर्यत जिल्ह्य़ातील २४३९ शाळांमध्ये वाचनालये सुरू करण्यात आली असून त्यासाठी ४१ हजार पुस्तके दान स्वरूपात लोकसहभागातून प्राप्त झाली आहेत.

सध्याच्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांपेक्षा भ्रमणध्वनी अधिक असल्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दानशुर व्यक्तींना पुस्तक दान करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्य़ात पहिली ते आठवीपर्यंतच्या ३२६६ शाळा आहेत. यापैकी २४३९ शाळांमध्ये वाचनालये सुरू झाली असून या शाळांमध्ये एक लाख ९९ हजार ५८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी वाचनालयांमध्ये पाच लाख ७२ हजार ७३३ पुस्तक उपलब्ध असून त्यामध्ये ‘डोनेट अ बुक ‘उपक्रमांतर्गत जमा झालेल्या ४१ हजार पुस्तकांची भर पडली आहे. गाव तेथे वाचनालयांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये २१५२ वाचनालये, ग्रामपंचायत कार्यालयात २९, समाज मंदिरात १५६ तर इतर ठिकाणी ९५ वाचनालये सुरू करण्यात आलेली असून सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. यासाठी वाचनालयांमध्ये दररोजच्या नोंदी ठेवण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश म्हसकर यांनी दिली.

२२ ऑगस्ट रोजी लोकसहभागातून पुस्तके मिळवून शाळेत वाचनालय सुरू करण्याचा प्रथम मान निफाडच्या सारोळे शाळेने मिळवला होता. नंतर सर्व शाळांमध्ये या उपक्रमास सुरुवात झाली. देवळा तालुक्यातील फागंदर शाळेतील विद्यार्थी शेतातील बांधावर बसून निसर्गाच्या सान्निध्यात पुस्तकांचे वाचन करीत आहेत. इतरत्र विद्यार्थी भ्रमणध्वनीऐवजी वाचनाकडे लक्ष देत असल्याचे चित्र आहे.

ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीची दोन चाके आहेत. परंतु, आधुनिकतेच्या युगात भ्रमणध्वनी, इंटरनेटच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. त्याकरिता गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यासाठीच जिल्हा परिषदेने पुस्तक दान करा हा उपक्रम सुरू केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असून यातून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासही मदत होणार आहे.

– लीना बनसोड (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)