• दिव्यांची किंमत पावणे चार लाख
  • महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

 

नाशिक : आढावनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ५५ पैकी ५३ एलईडी दिवे गायब होण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची साशंकता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाने ही घटना लक्षात आल्यानंतर १३ दिवसांनी संकुलातील दिवे चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विद्युत विभागाच्या संशयास्पद कार्यपध्दतीवरून चांगलाच गदारोळ उडाला होता. जीर्ण खांबांचे सर्वेक्षण, क्रीडा संकुलात दिवे बसविले होते की कागदे रंगवत देयके काढली गेली, असे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. या घटनाक्रमानंतर प्रशासनाने घाईघाईत पावणे चार लाखाचे दिवे चोरीला गेल्याची तक्रार दिली.

शहरातील जुन्या दिव्यांच्या जागी बसविले जाणारे एलईडी दिवे, जीर्ण खांबांचे सर्वेक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून गायब झालेले एलईडी दिवे यावरून सदस्यांनी विद्युत विभागाला जबाबदार धरत या विभागाचे प्रभारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापौरांनी वनमाळी यांच्याकडून विद्युत विभागाचा पदभार काढून घेतला. या विभागाच्या कारभाराच्या चौकशीचे निर्देश दिले होते.

प्रभाग क्रमांक १७ मधील क्रीडा संकुलातील लाखो रुपये किंमतीचे दिवे गायब झाल्याकडे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी लक्ष वेधले होते. इतक्या उंचीवर बसविलेले दिवे सहजासहजी कोणाला काढता येणार नाही. दिवे बसविल्याच्या खुणा तिथे असायला हव्यात. दिवे न बसविता परस्पर देयके लाटण्याचा हा प्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. दिवे चोरीला जाऊनही पोलीस ठाण्यात तक्रार का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला.

११ जानेवारी रोजी क्रीडा संकुलाची पाहणी करतांना अधिकाऱ्यांना क्रीडा संकुलात बसविलेले दिवे गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पुन्हा एकवार पाहणी झाली. मात्र, याबद्दल १३ दिवस तक्रार न देणाऱ्या प्रशासनाने आता दिवे चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार ११ आणि १३ जानेवारी रोजीच्या क्रीडा संकुलाच्या पाहणीत ५५ पैकी ५३ एलईडी दिवे दिसले नाही. संकुलाच्या उत्तरेकडील दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला होता. यामुळे संकुलात बसविलेले ५३ दिवे चोरटय़ाने चोरून नेल्याचे लक्षात आले. या संदर्भात पोलीस ठाण्यात १५ जानेवारीला अर्ज दिला गेला. वरिष्ठांच्या आदेशानुसार नंतर चोरीची तक्रार देत असल्याचे प्रभारी उपअभियंता संजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

‘१० महिन्यांनी जाग येण्यामागे गौडबंगाल’

दसक शिवारातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे काम मार्च २०१९ मध्ये पूर्ण झाले आहे. त्याचवेळी तिथे विद्युत विभागाचे कामही पूर्ण झाले होते. मात्र १० महिन्यानंतर महासभेत आवाज उठविल्यानंतर विद्युत विभागाला जाग आली आणि एलईडी दिवे चोरीला गेल्याची तक्रार दिली. यामध्ये मोठा गैरव्यवहार आणि गौडबंगाल आहे. क्रीडा संकुलासाठी केंद्राचा निधी वापरला असून त्यावर डल्ला मारण्याचे काम झाले आहे. याबाबतची तक्रार पंतप्रधान कार्यालयासह केंद्रीय क्रीडा खात्याकडे केली जाईल. विद्युत विभागाच्या शहरातील सर्व ठिकाणच्या कामांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे नगरसेक प्रशांत दिवे यांनी म्हटले आहे.