उत्सव खर्चीक होण्याची भाविकांना भीती

नाशिक : राज्य सरकारने थर्माकोल वापरावर बंदी आणल्याने सार्वजनिक उत्सवात सजावटीवर मर्यादा आल्या आहेत. सजावटकारांसह नागरिकांनी या बंदीचे स्वागत केले असले, तरी थर्माकोलवर पर्याय काय, याची चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे उत्सव खर्चीक होतील अशी भीती भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अवघ्या महिन्यावर आलेल्या गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. मूर्तिकारांच्या हस्ते गणेशमूर्ती आकर्षक रंगात रंगत असताना उत्सव काळात सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजण्यास सुरुवात झाली आहे. यंदा बंदीमुळे बाजारपेठेतून थर्माकोल गायब झाल्याने सजावट कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. घरगुती गणेशोत्सवात थर्माकोलचे खांब, अन्य नक्षीदार जाळ्या आदींचा वापर करत आकर्षक मखर तयार करण्यात येते. काही जणांकडून तयार थर्माकोलच्या मखराला पसंती दिली जाते. आता थर्माकोल बाद झाल्यामुळे सजावटीसाठी रंगीत पडदे, आकर्षक कृत्रिम वेगवेगळ्या रंगातील फुले, प्लास्टिक झिरमाळ्या, शामियानाची प्रतिकृती असणारे कापडी मंदिर, वेगवेगळ्या रंगसंगतीतील विद्युत माळा आदी पर्याय समोर येत आहेत. बंदीने सजावटकारांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने सजत असली, तरी सजावटकारांकडून त्याची तयारी पाच ते सहा महिने आधीपासून सुरू होते. बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीविषयी अनेकांमध्ये संभ्रम आहे.

कमी जाडीची लाकडी फळी, फोम, ओरिगामी पद्धतीचा वापर, विद्युत रोषणाई, रंगीत फुले यासह पर्यावरणपूरक साधनांचा वापर करत सजावटकारांकडून वस्तू तयार करण्यास सुरुवात झाली आहे. या वस्तू कायमस्वरूपी असल्या तरी जागा अडवून ठेवतील तसेच प्रत्येक वेळी ग्राहकाची मागणी वेगळी असते. जागा आणि खर्च याचा ताळमेळ बसविताना उत्सव काळातील सजावटीचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

अडचणी वाढल्या

थर्माकोल बंदी आहे की नाही, याविषयीच मुळात संभ्रम आहे. यामुळे सजावटीसाठी मंदिर तयार करताना कशाचा वापर करायचा यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध सुरू आहे. फोमशीट, वूडन प्लायवूड, रंगीत पडदे, फुले (नैसर्गिक आणि कृत्रिम) अशा वस्तूंचा वापर करत सजावटीचे काम सुरू आहे. थर्माकोल बंदीमुळे कामात अडचणी वाढल्या असून काम करताना मर्यादा येत आहेत.

      – नीलेश देशपांडे,  सजावटकार