नाशिक : जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी विविध पर्यायांची पडताळणी केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून करोनाबाधितांच्या उपचारासाठी देवळाली लष्करी रुग्णालयाचाही विचार सुरू झाला आहे. परंतु, लष्करी हद्दीतील या रुग्णालयात बाहेरील रुग्ण दाखल करण्यास काही मर्यादा असल्याचे समोर आले आहे.

देवळाली कॅम्प लष्करी हद्दीतील रुग्णालयाचा करोनासाठी उपयोग करता येईल काय, या दृष्टीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ब्रिगेडिअर शक्तीवर्धन यांच्यासमवेत लष्करी रुग्णालयाची पाहणी केली.

यावेळी विविध पर्यायांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात उपस्थित होते. सध्या देवळाली लष्करी रुग्णालयाची क्षमता ११४ खाटांची असून त्यामध्ये १२ व्हेंटिलेटर, २० हाय डिस्पेन्सरी कक्ष, चार अतिदक्षता आणि सर्वसाधारण ९० खाटा आहेत. या रुग्णालयास व्हेंटिलेटर, प्राणवायू तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास रुग्ण दाखल करता येतील काय, यावर विचार विनिमय करण्यात आला.

परंतु, या रुग्णालयात लष्करी क्षेत्राबाहेरील रुग्णांना दाखल करण्यास मर्यादित वाव आहे. हे देखील यावेळी निदर्शनास आले. देवळाली लष्करी रुग्णालय आणि जिल्हा  रुग्णालय येथे अधिकचे व्हेंटिलेटर, खाटा तसेच त्या अनुषंगाने लागणारी आवश्यक असणारी

साधन सामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना करण्यात आल्या आहेत.