शल्य चिकित्सकांच्या दालनात जैविक कचरा फे कण्याचा इशारा

नाशिक : करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आसपासच्या भागात एक मालमोटार भरेल इतके वापरलेले हातमोजे, संरक्षक पोशाख (पीपीई किट), औषधे असा जैविक कचरा पसरलेला आहे. रुग्णालयाची मल जलवाहिनी अनेक दिवसांपासून फुटलेली आहे. आरोग्यास धोकादायक असलेल्या समस्या दोन दिवसांत दूर न झाल्यास  सर्व कचरा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात टाकला जाईल, असा इशारा काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी दिला आहे.

प्रभाग क्रमांक १२ मधील जिल्हा रुग्णालय सभोवतालच्या स्थितीची माहिती डॉ. पाटील यांनी छायाचित्रासह जिल्हा शल्य चिकित्सकांसमोर मांडली आहे. जिल्हा रुग्णालय  पाच महिन्यांपासून करोनाशी लढा देत आहे.  रुग्णालयाने अन्य अत्यावश्यक बाबींकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केल्याची तक्रार डॉ. पाटील यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

जिल्हा रुग्णालयातील करोना कक्ष हा टिळकवाडी येथील शांतीवन, समृद्धी या सोसायटय़ांना लागून आहे. पूर्वी या कक्षात रुग्णांचे नातेवाईक खुलेआम फिरायचे. रुग्णांची शुश्रूषा करायचे. त्याबाबत आवाज उठवल्यानंतर कक्षातील वर्दळ कमी झाली. पण कक्षाच्या खिडकीतून डबे, पाण्याच्या बाटल्या यांची आवक-जावक सुरू आहे. यात भर पडली ती जैविक कचऱ्याची.

रुग्णालयाकडून त्याची विल्हेवाट लावली जात नाही. रात्रीच्या वेळी भटके कुत्रे पिशव्या फोडून कचरा इतरत्र पसरवून करोना प्रसारास हातभार लावत असल्याकडे डॉ. पाटील यांनी लक्ष वेधले.  आमचे आंदोलन हे करोनाचा प्रादुर्भाव थांबावा, डेंग्यू, मलेरियाचे केंद्र तयार होऊ नये म्हणून होईल असेही त्यांनी सूचित केले आहे.

फुटलेल्या वाहिनीतून सांडपाणी निवासी भागात

शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील उत्तरेकडील भिंतीलगतच्या प्रसाधनगृहाच्या फुटलेल्या वाहिनीतून सांडपाणी लगतच्या राजहंस सोसायटीच्या आवारात येत आहे. दरुगधीने रहिवासी हैराण झाले आहेत. यातून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. याच सोसायटीत डेंग्यूचे रूग्णही सापडलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी रुग्णालयावर असलेला ताण लक्षात घेऊन आजवर संयमाची भूमिका घेतली. परंतु, रुग्णालयाच्या कार्यपध्दतीत सुधारणा होत नसल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला आहे. फुटलेल्या वाहिनीबाबत राजहंस सोसायटीने रुग्णालयास पत्र दिले आहे. सांडपाणी आणि दरुगधीमुळे डासांची उत्पत्ती होऊन ही बाब आरोग्यास हानीकारक ठरत असल्याचे सोसायटीने म्हटले आहे.