नाशिक : करोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून बंधने पाळली नाही तर सर्व काही हाताबाहेर जाईल. नागरिकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. पण त्यांचे जीव वाचविणे अधिक महत्वाचे आहे. शासनाने त्यास प्राधान्य दिले आहे. उपचाराअभावी उद्या लोकांचे प्राण गेले तर सत्ता, पदे काय कामाची, असा प्रश्न करत कृषिमंत्री दादा भुसे यांनी टाळेबंदी हा अखेरचा पर्याय असल्याचे सूचित केले.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास भुसे यांनी जिल्ह्यासह मालेगावच्या करोनास्थितीचा आढावा घेतला. तत्पुर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी टाळेबंदीवर भाष्य केले. राज्यात करोनाचा कहर सुरू आहे. खाटा, रेमडेसिविर, प्राणवायुचा तुटवडा जाणवत असल्याचे नाकारता येणार नाही. रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने ही स्थिती कायम राहिल्यास रुग्ण ठेवायलाही जागा मिळणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. करोनाची साखळी तोडायची असेल तर टाळेबंदी हा शेवटचा पर्याय आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी हा चिंतेचा विषय असून गर्दी नियंत्रणासाठी नियोजन केले जाईल. कृषी माल विकण्यासाठी सवलत देण्यात आली तरी कोणीही नियम मोडू नये. करोना नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. राज्य शासनाने घेतलेले काही निर्णय आणि केंद्राने घेतलेला निर्यातबंदीचा निर्णय यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्शन पुरवठा स्थिती सुधारत आहे. दोन-तीन दिवसात ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा भुसे यांनी दिला.

करोना लढय़ात खासगी डॉक्टरांच्या योगदानाची गरज

मागील वर्षी करोना संकटात गल्ली, मोहल्ल्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रती माणुसकीच्या नात्याने रुग्णसेवा केली होती. त्यामुळेच मालेगावातील करोना रुग्णांची आकडेवारी झपाटय़ाने कमी होवून मालेगाव पध्दत म्हणून या कार्यास नावलौकिक मिळाला होता. त्याच पध्दतीने आता करोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधातील लढय़ात खासगी डॉक्टरांनी पुन्हा योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात करोना संकटाला तोंड देण्यासाठी शहरातील सर्व खासगी डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस भुसे बोलत होते.  यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. जतीन कापडणीस, डॉ. मयुर शहा, डॉ.यशवंत पाटील, डॉ. इम्रान, डॉ. अभय निकम, डॉ.अदनान हिंदुस्तानवाला आदींसह आयमाचे वैद्यकीय अधिकारी, औषध विक्रेत्यांचे प्रमुख उपस्थित होते.

करोना महामारीविरोधात पक्ष-भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने लढा उभारु आणि करोनाला हरवू, असेही भुसे म्हणाले. गतवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि खासगी डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानत भुसे यांनी रेमडेसिवीरचा अतिरेकी वापर घातक असल्याचे मत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले असल्याकडे लक्ष वेधले.

सामान्य रुग्णालयास पुरविण्यात आलेल्या प्राणवायू कॉन्संट्रेटर यंत्राच्या माध्यमातून प्राणवायू तुटवडय़ावर मात करता येत असल्याची शक्यता पडताळून आवश्यकता भासल्यास कॉन्संट्रेटर यंत्रांची मागणी नोंदविण्यात यावी. गृहविलगीकरणासह करोना काळजी के ंद्रातील रुग्णांना योगा आणि प्राणायामचे धडे देवून त्यांना वेळीच समुपदेशन करण्याबाबतही भुसे यांनी सूचना केल्या. आयमासह सर्व खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचारासह मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन करावे, त्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी आश्वासित केले. खासगी सिटी स्कॅन सेंटरमध्ये सर्व प्रकारचे रुग्ण चाचण्या करण्यासाठी जात असल्याने तेथून करोना पसरणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशी सूचना भुसे यांनी के ली.