अनिकेत साठे

करोनाच्या नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इंग्लंडसह काही युरोपीय देशात लागू झालेल्या टाळेबंदीने द्राक्ष निर्यातीवर पुन्हा एकदा चिंतेचे मळभ दाटले आहे. मागील हंगामात जगभरात लागू झालेल्या टाळेबंदीची झळ द्राक्ष निर्यातीला बसली होती. सध्याच्या अनिश्चिततेमुळे पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते की काय, याची उत्पादकांसह निर्यातदारांना धास्ती आहे. युरोपीय देशात माल जाण्यासाठी २० ते २५ दिवस लागतात. प्रवासादरम्यान अकस्मात काही निर्णय झाले तर निर्यातदार अडचणीत येतील. यंदा हा धोका असल्याने निर्यातीचे प्रमाण घटण्याची शक्यता खुद्द द्राक्ष निर्यातदार संघटना व्यक्त करीत आहे.

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून नियमित द्राक्ष हंगाम सुरू होत आहे. या वेळी ४३ हजारहून अधिक उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्यांची संख्या पाच हजारने वाढली. युरोपीय देशांसह परदेशातून भारतीय द्राक्षांची चांगली मागणी नोंदविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर मुबलक प्रमाणात माल उपलब्ध आहे. परंतु, इंग्लंडसह काही युरोपीय देशात लागू झालेली टाळेबंदी किती दिवस चालते, यावर सर्व काही अवलंबून असल्याचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे सांगतात. भारतीय द्राक्षांच्या एकूण निर्यातीतील निम्मी द्राक्षे इंग्लंडसह युरोपीय देशात जातात. मागील हंगामात एकूण एक लाख ९२ हजार मेट्रिक टन इतकी निर्यात झाली होती. म्हणजे जवळपास एक लाख मेट्रिक टन द्राक्ष युरोपीय देशांत पाठविली गेली. त्यात वाढ होण्याची शक्यता असताना करोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि सर्व समीकरणे विस्कटली. देशांतर्गत बाजारात माल विकणे अवघड झाले होते. अखेरच्या टप्प्यात मातीमोल भावात द्राक्षांची विक्री करावी लागली. टाळेबंदीचा मोठा फटका बसल्याने या हंगामात सावधगिरीने पाऊल टाकले जात आहे. भारतातून युरोपीय देशात माल जाण्यास बरेच दिवस लागतात. माल तिथे पोहचेपर्यंत काय निर्णय घेतला जाईल, हे सांगता येणार नाही. माल पाठविताना धोका पत्करावा लागेल. अनिश्चित वातावरणात निर्यातदार फारसा धोका पत्करणार नाहीत. याचा परिणाम निर्यातीवर होईल, याकडे खापरे यांनी लक्ष वेधले.

यंदाच्या हंगामात संकट

निर्यात वृद्धिंगत झाल्यास देशांतर्गत बाजारात द्राक्षास चांगले दर मिळतात. सर्वसाधारण परिस्थितीत युरोपीय देशात पाच किलो द्राक्षांची पेटी १२ युरोपर्यंत विकली जाते. मागील हंगामात टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे हे दर सहा ते सात युरोच्यावर गेले नव्हते. टाळेबंदीत नेहमीसारखी विक्री होत नाही. त्याचाही निर्यात, पर्यायाने भावावर परिणाम होईल, असे निर्यातदार सांगतात. दुसरीकडे निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात द्राक्षाचे भाव रसातळाला गेले होते. देशातील टाळेबंदीमुळे विक्रीवर मर्यादा आल्या. काढणी वा माल वेष्टित करण्यासाठी मजूर नव्हते. यंदाच्या हंगामात काही देशातील टाळेबंदी निर्यातीत अडथळा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

इंग्लंड, युरोपीय देशातील अनिश्चित वातावरणामुळे निर्यात प्रक्रियेवर भीतीचे सावट आहे. तेथील सुपर मार्केट, घाऊक बाजार सुरू आहेत. पण विक्रीचे प्रमाण थंडावले आहे. यामुळे द्राक्ष विक्रीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी राहील. युरोपीय बाजारात भारतीय द्राक्षांना दक्षिण आफ्रिका, चिलीच्या द्राक्षांशी स्पर्धा करावी लागते. संबंधित देशांना स्वत:ची देशांतर्गत बाजारपेठ नसल्याने मिळेल त्या भावात ते द्राक्ष विकतात. भारतात स्थानिक बाजारपेठ उपलब्ध आहे. उपरोक्त देशांचे दर पाहून भारतीय द्राक्षांची निर्यात होते. मागील टाळेबंदीत पाच किलोच्या पेटीचे दर नेहमीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले होते. युरोपीय देशात एक लाख मेट्रिक टन भारतीय द्राक्ष निर्यात होतात. जानेवारीत परिस्थितीत काय बदल होतात हे पाहून काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल.

– विलास शिंदे, (प्रमुख, सह्य़ाद्री फाम्र्स, नाशिक)