News Flash

मतदार यंत्रात बिघाडाची परंपरा कायम

नाशिक मतदारसंघात ४८ तर दिंडोरीमध्ये ३९ यंत्र बदलण्यात आल्याचे निवडणूक शाखेने म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्य़ात ८७ यंत्रे बदलली

नाशिक : उष्णतेच्या लाटेमुळे मतदानासाठी सकाळीत घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सुरुवातीला काही केंद्रांवर यंत्रांतील बिघाडाचा फटका सहन करावा लागला. चाचणी मतदानावेळी काही यंत्रात तांत्रिक दोष उद्भवले. मतदानास विलंब होऊ नये म्हणून यंत्रणेने तत्परतेने नाशिक, दिंडोरी मतदारसंघातील ८७ यंत्रे बदलली. त्यात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिटसह व्हीव्ही पॅटचाही अंतर्भाव आहे.

नाशिक मतदारसंघात ४८ तर दिंडोरीमध्ये ३९ यंत्र बदलण्यात आल्याचे निवडणूक शाखेने म्हटले आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, याकरिता यंत्रणेने चांगलीच सज्जता राखली होती. इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या मतदानात यंत्रांवर सर्व भिस्त असते. यंदा तर बॅलेट आणि कंट्रोल युनिटच्या जोडीला प्रत्येक यंत्रासोबत व्हीव्ही पॅट हे यंत्रही जोडलेले होते. प्रत्येक केंद्रात तिन्ही यंत्राच्या सहाय्याने ही प्रक्रिया पार पडली. चाचणी मतदानावेळी काही यंत्रात बिघाड असल्याचे लक्षात आले. यंत्रातील किरकोळ स्वरुपाच्या दोषाची शक्यता यंत्रणेने गृहीत धरली होती. दोन्ही मतदारसंघात चार हजार ७२० केंद्रात मतदानासाठी प्रत्येकी ५५१३ कंट्रोल पॅनल, बॅलेट युनिट तर ५९६९ व्हीव्ही पॅटचा वापर करण्यात आला. अकस्मात काही दोष उद्भवल्यास राखीव यंत्रांची सज्जता राखली गेली होती. ज्या ज्या केंद्रांवर यंत्रात बिघाड असल्याचे लक्षात आले, तिथे तातडीने ते बदलले गेले. एकूण यंत्रांची संख्या पाहिल्यास दोष निर्माण झालेल्या यंत्रांची संख्या नगण्य असल्याचे निवडणूक शाखेचे म्हणणे आहे. या किरकोळ अडचणी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सिन्नर मतदारसंघात ४७, नाशिक पूर्व १४, नाशिक मध्य सात, नाशिक पश्चिम चार, देवळालीत सहा, इगतपुरीत नऊ अशा एकूण ४८ यंत्र चाचणी मतदानावेळी बदलण्यात आली. १६ बॅलेट युनिट, १४ कंट्रोल युनिट आणि १८ व्हीव्ही पॅटचा समावेश आहे. नाशिकच्या तुलनेत दिंडोरीत मतदार संघात यंत्रात तुलनेने काहीसे कमी बिघाड झाले. नांदगाव तीन, कळवण नऊ, येवला चार, निफाड तीन, दिंडोरी ११ अशी एकूण ३९ यंत्रे बदलावी लागली. सुरूवातीचा हा अपवाद वगळता नंतर यंत्रातील बिघाडाचे प्रकार घडले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्य़ातील सर्व ५७२० केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. चाचणी मतदानावेळी ४१ व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटमध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळले. ही यंत्रे तातडीने बदलण्यात आली. मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर नऊ बॅलेट युनिट, तर चार व्हीव्हीपॅट यंत्र बदलावे लागले. मतदानासाठी वापरलेल्या ३८०० पैकी नऊ बॅलेट युनिटमध्ये तसेच १९६० पैकी चार व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक दोष उद्भवले. ही आकडेवारी पाहिल्यास प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे लक्षात येईल. हे दोष टाळण्यासाठी प्रशासनाने यावेळी अनोखी संकल्पना मांडली. विधानसभा मतदारसंघनिहाय यंत्रांचे संबंधित उपनिवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आधीच वितरण करण्यात आले होते. त्यांच्या स्तरावर यंत्रांची पडताळणी, उमेदवारांची नावे समाविष्ट करण्याची कामे केली गेली. यामुळे बिघडलेली यंत्रे मतदान केंद्रावर गेली नाही. परिणामी निवडणुकीत यंत्रातील बिघाडाचे प्रमाण अत्यल्प राखता आले.

-सूरज मांढरे (जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:42 am

Web Title: lok sabha election 2019 evm failure reported in dindori constituency
Next Stories
1 सखी मतदान केंद्रांवरील स्वागताने मतदार आनंदित
2 दुष्काळातही कांद्याची विक्रमी आवक
3 रणरणत्या उन्हात पाणी अन् पोटासाठी संघर्ष
Just Now!
X