‘वॉर रुम’मधून नजर

नाशिक : नाशिक, दिंडोरीसह धुळे मतदारसंघातील एकूण ४७२ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे ‘बेव कास्टिंग’ करण्यात आले. या केंद्रांतील प्रत्येक घडामोडींवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वॉर रुम’मधून नजर ठेवण्यात आली. संवेदनशील आणि सखी मतदान केंद्र असणारी केंद्रे ‘बेव कास्टिंग’मध्ये समाविष्ट करण्यात आली होती.

यंदाची लोकसभा निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यात आली. प्रचारार्थ उमेदवारांना परवानगी देण्यापासून ते मतदारांना आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविण्यापर्यंतच्या कामांकरिता विविध अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. दुसरीकडे काही निवडक मतदार केंद्रावरील मतदान प्रक्रिया वेबकास्टिंगद्वारे पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. निवडणूक कामासाठी वापरलेल्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. नाशिक, दिंडोरी मतदारसंघात एकूण ६० संवेदनशील केंद्रे होती. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एक यानुसार १५ सखी केंद्रांची स्थापना करण्यात आली.

संवेदनशील आणि सखी केंद्र असणाऱ्या मतदान केंद्रांचा वेब कास्टिंगमध्ये प्रामुख्याने समावेश करण्याचे निश्चित झाले होते. नाशिक, दिंडोरी मतदारसंघात एकूण चार हजार ७२० मतदान केंद्रे आहेत. त्यातील किमान १० टक्के केंद्रांवरून वेब कास्टिंग करावे, असे आयोगाने म्हटले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने जिल्ह्य़ातील ४७२ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे वेब कास्टिंग’ केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

वेब कास्टिंग, जीपीएसच्या आधारे प्रशासनाने संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण राखले. या केंद्रांवरील घडामोडींचे अवलोकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात १० कर्मचारी वेगवेगळ्या स्क्रिनद्वारे केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून होते. वॉर रुममधून अनेक अडचणी सोडविण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक घटक दृष्टिपथास आला. त्या त्या केंद्रांवर काय सुरू आहे, निवडणुकीशी संबंधित वाहने यावर प्रभावीपणे नजर ठेवणे शक्य झाले.